
निढोरी : सुवर्ण गणेश मूर्तीची मिरवणुक
मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी, ता. कागल येथे उत्तराभिमुख सुवर्ण गणेश मंदिराच्या गणेश मुर्तीची मिरवणूक भाविक भक्तांच्या अमाप उत्साहात काढण्यात आली. ओमसाई बहुउद्देशीय कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंचच्या पुढाकाराने या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.
मिरवणुकीमध्ये व्हन्नूर हायस्कूलच्या ५० मुलींच्या समुहाने सादर केलेला लेझीमीचा पारंपारिक खेळ मिरवणुकीतील आकर्षणाचा भाग ठरले. मिरवणूक मार्गावर रंगीबेरंगी रांगोळ्या व रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थ महिलांनी मूर्तीचे दारोदारी पूजन केले. सुरुवातीला राजेंद्र सुतार यांच्या हस्ते श्री मूर्तीचे पूजन करण्यात आले. तर मिरवणुकीचा प्रारंभ मंडळाचे अध्यक्ष संजय सुतार यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

साखरे महाराज मठापासून निघालेली मिरवणुक धार्मिक वातावरणात मगदूम गल्ली, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर मार्गे, लक्ष्मीनगर ते परत गणेश मंदिर या गावाच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. या मिरवणूकीत गावातील विविध तरुण मंडळे, संघटना, परिसरातील भजनी मंडळे व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
आज शुक्रवारी दि. १५ रोजी सकाळी ९ वा. श्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री संत अमृतानंद महाराज (जंगली महाराज मठ गोरंबे) यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२ नंतर महाप्रसाद वाटप, माहेरवासीनींना ओटी भरणे आणि रात्री ८ पासून रात्रभर सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार आहे.