ताज्या घडामोडी

शेतघरांना अन्यायी घरफाळा आकारणी

शेतघरांना अन्यायी घरफाळा आकारणी, कागल पालिकेवर स्वाभिमानीचा आरोप

कागल (सम्राट सणगर) : कागल नगरपालिकेच्या वतीने वार्षिक घरफाळा आणि पाणीपट्टी कर आकारणी करताना वेळेत कर भरला नाही म्हणून मासिक दोन टक्के, तर वार्षिक चौवीस टक्के व्याज आकारणी केली जात आहे, तसेच शेतवडीतील घरांनाही रहिवासी घराप्रमाणे कर आकारणी केली जात आहे.

ही आकारणी नागरिकांवर अन्याय करणारी आहे. या चुकीच्या कर आकारणी नगरपालिका प्रशासनाने त्वरित रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्याकडे केली आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, कागल शहराध्यक्ष राजेंद्र बागल, कुतुबुद्दीन शानेदिवान, कृष्णात शेंडे, पिंटू गुरव, सुजित हेगडे, कुंदन पाटील, महेश शिंदे आदी उपस्थित होते. कागलचे नागरिक पालिकेचे विविध कर नियमित भरतात. थकबाकीचे प्रमाण नगण्य आहे.

साधारणतः मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी, घरफाळा भरला जातो. असे असताना चौवीस टक्के व्याज आकारणी करणे अत्यंत चुकीचे आहे, नागरी क्षेत्राबाहेर शेतवडीत अनेकांचे जनावरांचे गोठे, शेतघरे आहेत. त्यांना रहिवासी क्षेत्राप्रमाणे घरफाळा आकारणी करू नये. असा ठराव व निर्णय पालिकेत झाला असताना प्रशासकीय पातळीवर हा निर्णय का बदलला आहे. ही घरफाळा आकारणी त्वरित रद्द करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *