बातमी

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम भारमल यांना वाचनालयाच्या वतीने अभिवादन

हुतात्मा तुकाराम रामचंद्र भारमल … मुरगूडचे आद्य हुतात्मा क्रांतीकारक

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडचे क्रांतीकारक हुतात्मा “तुकाराम भारमल ” यानां वाचनालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले . प्रथम प्रतिमा पूजन श्री .आण्णासो ज्ञानदेव गोधडे ( वस्ताद ) यांच्या हस्ते करण्यात आले.

इंग्रजांच्या जुलमी आणि अत्याचारी जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर १९२० साली महात्मा गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले. महात्मा गांधीजीनी अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. त्यातूनच गावोगावी क्रांतिकारकांच्या प्रभावी संघटना उभ्या राहिल्या. कोल्हापूर संस्थानात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली एक स्वातंत्र्य चळवळ उदयास आली.

९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधीजी इंग्रजांना ‘भारत छोडो ‘चा आंदोलन नारा दिला तर देशवासीयांना ‘करो या मरो’ चाआदेश दिला . आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे अंतिम पर्व सुरू झाले . याचे लोन देशभर पसरेल या भीतीने इंग्रजांनी महात्मा गांधी , जवाहरलाल नेहरू यांच्यासह नेत्यांना अटक केली. याचे तीव्र पडसाद देशभर पसरले . त्यातूनच इंग्रजांना नामोहरण करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब सुरु झाला.

प्रभातफेऱ्या ..सरकारी चावडीतील दप्तर हस्तगत करणे.. टपाल कार्यालयातील टपाले पळवणे …पोलीस ठाण्यावर हल्ला करणे.. पोलिसांच्या बंदुका हस्तगत करणे ..टेलीफोन तारा तोडणे.. रेल्वे वाहतूक बंद पाडणे अशा विविध मार्गाने देशासह कोल्हापूर संस्थानातही हे आंदोलन सुरु झाले.

कोल्हापूर संस्थानातील गारगोटी पोलीस कचोरीवर हल्ला करून राज बंद्याना मुक्त करणे ..पोलिसांची हत्यारे हस्तगत करणे .. दळणवळण यंत्रणा तोडणे आणि जुलूम जबरदस्तीने इंग्रजांनी वसूल केलेला सारा (खजिना) ताब्यात घेणे यासाठी रविवार दिनांक १३ डिसेंबर १९४२ रोजी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या आदेशाने कोल्हापूरचे गोपाळराव बकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांच्या एका गटाने नियोजनाप्रमाणे गारगोटी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. त्यात मुरगूडचे १७ वर्षीय तरुण क्रांतीकारक तुकाराम भारमल पोलिसांची गोळी छातीत बसून हुतात्मा झाले. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा तुकाराम रामचंद्र भारमल यांच्या बलिदानाची गाथा यानिमीत्ताने आपणासमोर येत आहे.

कोल्हापूर संस्थानातील कागल जहागिरीत मुरगूड हे त्याकाळचे संपन्न गाव.. तांदळाची व्यापारपेठ म्हणून मुरगूड चा नावलौकिक … त्यामुळेच स्वातंत्र्य चळवळीचे मुरगुड हे प्रमुख केंद्र बनले होते. याच मुरगूड शहरात १९२५ रोजी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात वडील रामजी उर्फ रामचंद्र व आई रमाबाई यांच्या पोटी तुकाराम भारमल यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच तुकाराम शाळेत हुशार व चपळ.. प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना सहकार्‍यांसोबत त्यांच्या अनेक लीला सुरू असायच्या.. शहरा लगत असणाऱ्या सर पिराजी तलावाच्या दीडशे फूट उंच भिंतीवर चढण्याचा विद्यार्थीदशेत त्यांनी पराक्रम केला होता.आजही तो विक्रम अबाधित आहे. मुरगूड हे स्वातंत्र्यसैनिकांच्या चळवळीचे केंद्र असल्याने सहाजिकच लहानग्या तुकाराम यांचा ओढा क्रांतिकारकांच्या सोबत असायचा. मुरगुड शहरात निघणाऱ्या विविध स्वातंत्र्याच्या कार्यक्रमात तुकाराम भारमल लहानपणापासूनच नेतृत्व करण्यासाठी सर्व कार्यक्रमात पुढे असायचे.

१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि इंग्रजांनी जबरदस्तीने भारतातल्या तरुणांना सैन्यात भरती होण्याचे फर्मान काढले. मुरगूड शहरातही इंग्रजांच्या भरतीचे फर्मान सुटले आणि अनेक तरुणांना भरतीसाठी शहराच्या संस्थानकालीन विश्रामगृहात डांबून ठेवण्यात आले.या घटनेचा निषेध म्हणून तुकाराम भारमल यांनी आपल्या सहकार्‍यांसह थेट विश्रामगृहावर दगडफेक करत तरुणांना सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात एक दगड इंग्रज अधिकाऱ्याच्या डोकीवर लागला. त्यामुळे संतापलेल्या या इंग्रज अधिकाऱ्याने कोवळ्या वयाच्या हुतात्मा भारमल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढल्याने तुकाराम भारमल भूमिगत झाले.यातूनच त्यांचा वावर मुरगूडचे क्रांतिवीर ईश्वरा गोधडे, डॉ. लक्ष्मणराव मेंडके,तुकाराम बोभाटे, सखाराम बोरगावे यांच्या सानिध्यात आला. तिथूनच तुकाराम भारमल यांच्यात स्वातंत्र्यलढ्याची बिजे पेरली गेली.

९ ऑगस्ट च्या चलेजाव च्या आदेशानंतर मुरगूड शहरात गोपाळराव बकरे यांच्या नेतृत्वाखाली एक गुप्त सभा झाली.या सभेस तुकाराम भारमल उपस्थित होते.येथेच गारगोटी खजिना लुटीचा बेत निश्चित झाला. कापशी चे प्रसिद्ध मल्ल व गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी करवीरय्या स्वामी याचे नेतृत्व दिले गेलेया बैठकीत कोल्हापूर संस्थानासह सीमाभागातील क्रांतीकारकांनी सहभाग घेतला होता. रविवार दिनांक १३ डिसेंबर १९४२ हा दिवस हल्ल्यासाठी निश्चित करण्यात आला त्यासाठी गारगोटी जवळच्या पालीच्या गुहेत निवडक क्रांतिवीरांना प्रशिक्षण देण्यात आले.यात तुकाराम भारमल हे अवघ्या १७ वर्षाचे सर्वात तरुण क्रांतिकारक होते. ठरल्याप्रमाणे गारगोटी कचरी वर हल्ला करून खजिना लुटताना पहाऱ्यावर असणाऱ्या सैनिकांना याची कुणकुण लागल्याने प्रचंड मोठा गोळीबार झाला या गोळीबारात तुकाराम भारमल यांच्यासह अन्य सहा जणांना ह हौतात्म्य पत्करावे लागले. आपल्या प्राणाचे बलिदान देऊन या सर्वांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले.

देशभर अशाच प्रकारे उठाव झाल्याने अखेर इंग्रजांना १९४७ साली भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले.पण त्यासाठी तुकाराम भारमल यांसारख्या अनेकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीवर आपल्या बलिदानाची आहुती देऊन स्वतःचे नाव अजरामर केले.या अमर हुतात्म्यांना देशही विसरला नाही. मुरगूड शहराने हुतात्मा भारमल यांच्या गौरवार्थ शहराच्या मध्यवर्ती परिसरात हुतात्मा भारमल यांचा पुतळा उभारला तर त्यांच्या नावाने हुतात्मा चौक बांधला .केंद्र सरकारने हुतात्मा स्मारकाची निर्मिती करून भारमल यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या आहेत. याशिवाय मुरगूड शहरातील शासनमान्य वर्ग ग्रंथालयाला हुतात्मा तुकाराम भारमल यांचेच नाव दिले गेले आहे. तर दरवर्षी १३ डिसेंबर हा दिवस मुरगुड परिसरात स्फूर्ती दिन म्हणून साजरा केला जातो.गारगोटी येथून क्रांतीज्योत आणून स्वातंत्र्याचा अनुपम सोहळा जागविला जातो.

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम रामचंद्र भारमल यांनी स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीवर आपल्या बलिदानाची आहुती देऊन स्वतःचे नाव अजरामर केले.या अमर हुतात्म्यांना देशही विसरला नाही. मुरगूड शहराने हुतात्मा भारमल यांच्या गौरवार्थ शहराच्या मध्यवर्ती परिसरात हुतात्मा भारमल यांचा पुतळा उभारला तर त्यांच्या नावाने हुतात्मा चौक बांधला .केंद्र सरकारने हुतात्मा स्मारकाची निर्मिती करून भारमल यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या आहेत. याशिवाय मुरगूड शहरातील शासनमान्य वर्ग ग्रंथालयाला हुतात्मा तुकाराम भारमल यांचेच नाव दिले गेले आहे. तर दरवर्षी १३ डिसेंबर हा दिवस मुरगुड परिसरात स्फूर्ती दिन म्हणून साजरा केला जातो. शहरभर दारादारात सात पणत्या लावून क्रांतिकारकांच्या बलिदानाला अभिवादन करण्यात येते. तर गारगोटी येथून क्रांतीज्योत आणून स्वातंत्र्याचा अनुपम सोहळा जागविला जातो.

या अभिवादन प्रसंगी श्री . शिवाजी चौगले, किरण गवाणकर, रामचंद्र कांबळे, रमेश भोपळे, मारुती कांबळे, सदाशिव यादव, अविनाश चौगले, प्रा .डी.डी. चौगले, बी .एस. खामकर, तानाजी डेळेकर, संतोश खराडे, ग्रंथपाल संदीप वरपे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *