कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्याचेच नाव कर्करोगाला दिले जाते. उदा. आतड्यांमध्ये सुरू होणाऱ्या कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात.
ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन त्या इतर ऊतींवर हल्ला करू शकतात, अशा सर्व आजारांसाठी कर्करोग हा शब्द वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी रक्त तसेच लसिका प्रणालीमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकतात.
कर्करोगाचे मुख्य प्रकार-
कार्सिनोमा: त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणारा कर्करोग.
सार्कोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.
ल्यूकेमिया: रक्त तयार करणाऱ्या ऊतींमध्ये (उदा. अस्थिमज्जा) उगम पावणारा कर्करोग,
यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्त प्रवाहात मिसळतात.
लिंफोमा आणि मायलोमाः शरीराच्या प्रतिकार यंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.
सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सर: मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग.
कर्करोगाचे मूळ–
आपल्या शरीराचे मूलस्थान असलेल्या जीवनदायी पेशींमध्ये (सेल्स) सर्व प्रकारचे कर्करोग जन्म घेतात. आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या पेशी असतात. ह्या पेशी वाढून त्यांचे नियंत्रित पद्धतीने विभाजन होते आणि त्यामधून नवीन पेशी तयार होतात. आरोग्य टिकवण्यासाठी ही क्रिया होणे गरजेचे असते. पेशी म्हाताऱ्या होतात किंवा खराब होतात तेव्हा त्या मरतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात.
परंतु, कधीकधी ही नीट चाललेली प्रक्रिया बिघडते. एखाद्या पेशीमधील जनुकीय (DNA) नकाशा बदलतो किंवा खराब होतो आणि त्यामध्ये उत्परिवर्तन (म्युटेशन्स) निर्माण होते. ह्या म्युटेशन्समुळे पेशीची सर्वसाधारपणे होणारी वाढ आणि विभाजन यावर परिणाम होतो. अशा पेशी म्हाताऱ्या होऊन मरत नाहीत आणि परिणामी तेथे नवीन पेशी येत नाहीत. ह्या अतिरिक्त पेशींचा एक गठ्ठा बनतो. त्याला ट्युमर (गाठ) असे नाव आहे. सर्व ट्युमर कर्करोगजन्य नसतात. ट्युमर निरुपद्रवी किंवा जीवघेणा असून शकतो.
निरुपद्रवी (बेनाइन) ट्युमर: कर्करोगजन्य नसतात. ते काढून टाकता येतात आणि बहुतांश प्रकरणांमध्ये ते पुनः वाढत नाहीत. निरुपद्रवी ट्युमरमधील पेशी शरीरात इतरत्र पसरत नाहीत.
जीवघेणा (मॅलिग्नंट) ट्युमर: कर्करोगजन्य असतो. अशा ट्युमरमधील पेशी त्यांच्या आसपासच्या पेशींवर हल्ला करून शरीरात इतरत्र पसरतात, कर्करोगाच्या अशा पसरण्याला मेटास्टॅटिस असे म्हणतात.
रक्तक्षय (ल्युकेमिया): हा अस्थिमज्जा आणि रक्ताचा कर्करोग असतो. त्याचा ट्युमरशी संबंध नाही.
लक्षणे–
छाती किंवा शरीराच्या इतर भागात गाठ जाणवणे. त्वचेवर नवीन तीळ उद्भवणे किंवा असलेल्या तिळात बदल होणे. बरी न होणारी जखम. आवाज बसणे किंवा खोकला बरा न होणे.
पचनसंस्थेत किंवा लघवी होण्याच्या सवयींमध्ये बदल.खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटणे. गिळताना फार त्रास होणे. विनाकारण वजन वाढणे अथवा घटणे. अनैसर्गिक रक्त अथवा इतर स्त्राव होणे. फार थकल्यासारखे वाटणे.
बहुतेक वेळा ही लक्षणे थेट कर्करोगामुळे उद्भवत नाहीत. निरुपद्रवी ट्युमर वा इतर काही कारणांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. याबाबत फक्त डॉक्टरच खात्रीने सांगू शकतात.
वरील लक्षणे दाखवणाऱ्या किंवा आरोग्य विषयक समस्या असलेल्या व्यक्तीने शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. कर्करोगाच्या सुरूवातीला दुखत नाही. त्यामुळे ही लक्षणे असल्यास, दुखू लागण्याआधी, डॉक्टरांना भेटा.
– प्राचार्या डॉ. एस. एफ. देशमुख (आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर)