बातमी

डॉल्बीला फाटा देत सामाजिक सलोखा राखण्याचे कार्य करा – पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार

कागल ( विक्रांत कोरे ) : डॉल्बी मुक्त गणेश जयंती साजरी करा, तसेच डॉल्बीला फाटा देत सामाजिक सलोखा राखण्याचे काम मंडळांनी करावे. शासनाच्या सामाजिक उपक्रमात मंडळांनी सहभाग घेऊन पारितोषिके मिळवावीत असे आवाहन कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले. करनूर ता. कागल येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये गणेश चतुर्थी पूर्व बैठकीदरम्यान ते बोलत होते.

लोहार पुढे म्हणाले, गणेश मंडळांनी मिरवणुकीमध्ये डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्याचा वापर करून सामाजिक सलोखा जपावा व सामाजिक उपक्रमांनी गणेश जयंती साजरी करावी असे आव्हान त्यांनी केले. दोन बेस दोन टॉपच्या धर्तीवर आवाजाची तीव्रता वाढवली जाते. ती आवाजाची तीव्रता आता मिरवणुकीमध्ये रीडिंग घेऊन संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. त्यामुळे डॉल्बीमुक्त गणेश जयंती करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुलांनी करिअर कडे लक्ष द्यावे. अशा गुन्ह्यांमुळे पोलीस स्टेशनचे दाखले मिळताना त्यांना अडचणी येतात. त्यामुळे मंडळांनी समाज प्रबोधन व्याख्यानांचे आयोजन करावे व विचारांचा प्रचार व प्रसार करत गावात शांतता, सलोखा राहिला पाहिजे असे कार्य करा.

तसेच मंडळांच्या वतीने गावांच्या मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चोरीसारख्या प्रकाराला, व इतर गुन्ह्यांना आळा बसेल असे त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान कागल पोलीस ठाण्याचे पोलिस अशोक पाटील, सुनील पाटील, गाव कामगार पोलीस पाटील सुरज कांबळे, राजमहम्मद शेख, तंटामुक्त अध्यक्ष वैभव आडके, बाबुराव घोरपडे, करनूर, रामकृष्णनगर मधील गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *