कोल्हापूर, दि. 14 : सद्यस्थितीत मधुमेह, थायरॉइड व स्थूलता इत्यादी रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. या आजारांवर उपचार करण्या-या अतिविशेष उपचार तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून या आजारांवर उपचार करणा-या अतिविशेष उपचार तज्ञ डॉक्टरांची बाह्यरुग्ण सेवा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. या सेवांचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता सीपीआर रुग्णालयात होणार असून संबंधित रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे
.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यातील तसेच इतर शेजारी जिल्ह्यातील विविध आजारांचे रुग्ण येत असतात. रुग्णांसाठी मंगळवार व गुरुवारी अतिविशेषोपचार सेवा देण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- मंगळवार- सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत- ओपीडी क्र. 112- अंतस्रावी ग्रंथीचे आजार- (उदा. मधूमेह, स्थूलता, गर्भवती स्त्रियांमधील मधूमेह, लवकर वयात येणे किंवा उशीरा वयात येणे, तरुण वयातील रक्तदाब, पीसीओडीचे आजार, हाडांची ठिसूळता, चेह-यावरील अनावश्यक केस, बाळाचे लिंग न समजणे, अवेळी छातीमधून स्त्राव येणे, कमी उंची, पियुशी ग्रंथी, स्वादुपींड, एड्रीनल ग्रंथी यांचे आजार व इत्यादी)
गुरुवार- सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत- ओपीडी 112- संधीवाताचे आजार -(उदा. आमवात, पाठीच्या मणक्याचा संधीवात (बांबूवात), लूपस, स्केरोडर्मा, गुडघ्यांच्या झीजेचा संधिवात, सोरायसिस, जोग्रेन डीसीज (डोळ्यांची तोंडाची कोरड ), JIA ( लहान मुलांमधील संधिवात), ऑस्टीओपोरोसीस ( हाडांचा ठिसूळपणा), गाऊट (युरीक अॅसीडचा संधिवात ) मायोसायटीस, सॉफ्ट टिशू हमॅटिझम (टेनिस एल्बो, गोलफर्स एल्बो, टेंडोनाइटीस) इ. या आजारांवर अतिविशेष तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येणार आहे.