बातमी

राजकारणामुळे गावातील यात्रांचा बोजवारा

कागल (कृष्णात कोरे) : गेल्या तीन वर्षा पासून सर्वत्र कोरोना महामारीची लाट पसरली. सार्वजनिक उत्सव- यात्रा- म्हाई बंद झाले. शौकिनांच्या उत्साहावर पाणी फिरले. आता कुठे कोरोणा- महामारी मागे फिरली आहे तर पुन्हा यात्रा – म्हाई – सार्वजनिक कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

प्रत्येक गावा-गावातील म्हाई- यात्रा म्हणजेच त्या गावातील ग्रामीण परंपरेचा वसा जपण्याचेच काम असते. या यात्रा म्हणजे पै- पाहुण्यांना, मित्रांना, सासरी असलेल्या लाडक्या मुलींना एकत्र आणण्याचे निमित्त असते.

आजच्यापेक्षा पूर्वी भरणाऱ्या यात्रा या गाव-गाड्यातील स्नेह आणि जिव्हाळा घेऊन येत असत. नदीला दुथडी पाणी आले, भागाभागातून कालवे गेले त्यामुळे शेताचे शिवारात हिरवाईन शालू नेसला. धनधान्याने घरा-घरामध्ये समृद्धी आली.

गावातील यात्रेमध्ये सुद्धा राजकारण शिरले .देवाच्या यात्रेतील सर्व पुढाकार माझ्याच गटाकडे असावा, यासाठी मतभेद होऊ लागले. पर्यायाने आनंद – समाधान मिळण्यापेक्षा सत्ता इर्षेतून कटुताच जास्त निर्माण झाली. श्रीमंती बरोबर मी पणाने जमिनीवरील पाय बाजूला झालेले सत्ताधारी मंडळी गावगाड्यातील मानाचे मानकरी मंडळींना दाद देईनासे झाले. गावातील देवस्थान त्याची पूजा-अर्चा करण्याचा मान परंपरेने असणाऱ्या मंडळींना, निवडून आलेल्या मंडळींनी त्यांना बाजूला करून आपणच मानाच्या जागा पटकावल्या. राजकारण्यांमुळे मान गेला आणि अभिमान निर्माण झाला.यातून सामाजिक शिस्तीचे गढूळ वातावरण गावागावांमध्ये निर्माण होऊ लागले.

एक काळ असा होता की म्हाई-यात्रा आली की, गावा-गावा मध्ये दारा-दारामध्ये आनंदाचा महापुर ओसंडून वहायचा. घरातील कर्ता माणूस चालत जाऊन पाहुण्यांच्या जेवणाचे आग्रहाचे निमंत्रण द्यायचा. आज समक्ष निमंत्रण देण्याची प्रथा कालबाह्य झाली. मोबाईलवरून जेवणाची तारीख आणि वेळ सांगितली म्हणजे आपली जबाबदारी संपली या निमंत्रणामध्ये प्रेम आणि जिव्हाळ्याचा लवलेश राहिलेला दिसत नाही.

यात्रेमध्ये जागराची देवाची पालखी, सासनकाठी नाचविण्यासाठी गावातील आणि बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळींची स्पर्धा लागायची. देवाची सेवा केल्याचे समाधान त्यांना मिळायचे. लहान मुले आपल्या आई-वडिलांना घेऊन खेळणी पसंत करायची आणि आई-वडिलांनी समाधानाने पैसे भागवायचे. दुपारी कुस्त्यांचे मैदान, गावागावातील पैलवान मंडळी, मैदानात उतरत असत. कुस्ती जिंकली किंवा हरली यापेक्षा देवाच्या यात्रेत कुस्ती खेळण्याची संधी मिळाल्याचा आनंद या पैलवानाना मिळत असे. जुनी जाणती मंडळी वस्तादकिच्या भूमिकेत त्यांच्या खेळाचे मूल्यमापन करीत असत. कुस्तीच्या मानधनापेक्षा मानाचा नारळ, चांदीची गदा, यापेक्षा मोठा वाटत असे. संध्याकाळी गावाच्या आणि पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी तमाशाचा फड गाजायचा.

परंतु आज यात्रेचे सर्व चित्र बदललेले आहे. निवडणुकांमुळे मने कलुषित झाली आहेत. यात्रेतील सर्व कार्यक्रमांमध्ये राजकारण आल्यामुळे सर्व गावकरी सहभागी होत नाहीत. एकाच गावात दोन – दोन मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कार्यक्रम पाहून समाधान होण्यापेक्षा कार्यक्रमात अडथळे कसे निर्माण होतील हे पाहिले जात आहे. गावाचा एकोपा सांभाळणारी यात्रा वादाला सुद्धा कारणीभूत होते. एकविसाव्या शतकातील स्वयंपूर्ण स्वावलंबी गाव निर्माण करण्यासाठी आपण म्हाई – यात्रेच्या निमित्ताने मने साधण्याचा प्रयत्न केला तर गावागावांमध्ये वैरभाव संपून एकोपा निर्माण होईल. यासाठी सोज्वळ, निस्वार्थी, प्रामाणिक आणि पारदर्शी पुढाकाराची गरज भासत आहे हे मात्र यातून दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *