मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात सुमारे ९० . लाख रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि चबुतऱ्यासह सुशोभिकरणाचे अंतिम टप्प्यात आहे . आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. भगव्या झेंड्यानी सजलेली बाजारपेठ, शिवछत्रपतींचा जागर आणि शिवसेनेच्या घोषणांनी शिवमय वातावरणात हा पुतळा चबुतऱ्यावर बसविण्यात आला.
शिवसेनेने आपल्या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती येत्या काही दिवसात दिमाखदार सोहळ्याने होणार आहे. मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. वीरेंद्र मंडलिक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे काम करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुणे येथील दिवंगत शिल्पकार बी. आर. खेडेकर यांची कन्या सीमा शिर्के यांनी साडे बारा फूट उंचीचा हा अश्वारूढ पुतळा बनविला आहे.
शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आघाडीच्या वतीने निवडणुक जाहीरनाम्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा बसवण्याचे अभिवचन शहरवासीयांना दिले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह १७ पैकी १४ जागा नगरसेवकांसह शिवसेनेने जिल्ह्यातील या एकमेव पालिकेवर भगवा फडकावला. प्रशासकीय मंजुरी व अन्य शासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यावर या पुतळ्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली.
पालिकेच्या प्रांगणात रिकाम्या जागेत सुशोभीकरणासह अश्वारूढ पुतळा बसवला जाणार आहे. मंडलिक युवा प्रतिष्ठापनने पुतळ्याच्या खर्चाचा संपूर्ण भार उचलला आहे.प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक यांनी आपला वाढदिवस रद्द करून दोन लाख रूपये या पुतळ्यासाठी दिले. पालिका कर्मचारी, शिवभक्त व शहरवासीयांच्या मदतीचा हात दिल्याने निर्धारित वेळेत पुतळ्याचे काम पूर्ण होऊन आज सन्मानपूर्वक मुरगूड चा बाजारपेठेतून शिवपुतळा ची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद …..
शिवसेनेने निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यानुसार अनेक प्रशासकीय अडथळे पार करत व काटकसरीचे आर्थिक नियोजन सांभाळत या प्रकल्पाची पूर्तता करण्यात यश मिळवले. पालिका प्रशासनासह मदतीच्या शेकडो हातांमुळे छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचे सुवर्णपान यानिमित्ताने मुरगूड नगरीचे भूषण बनणार आहे. मुरगूडच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळाही दिमाखदार होईल. – अॅड. वीरेंद्र मंडलिक अध्यक्ष मंडलिक युवा प्रतिष्ठान.