शिंदेवाडी येथे ड्रोन तंत्राद्वारे फवारणी प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
मुरगुड( शशी दरेकर ) – सभासद, शेतकऱ्यांच्या हितासाठी शाहू साखर कारखान्न्यामार्फत नवनवीन संकल्पना राबविणार आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. शिंदेवाडी ता.कागल येथे शाहू साखर कारखान्यामार्फत विजय गोधडे यांच्या ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिकवेळी ते बोलत होते.या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
श्री.घाटगे पुढे म्हणाले,शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यामार्फत ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्याची परंपरा निर्माण केली आहे.
तीच पुढे चालविताना शाहूच्या शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादन वाढीसाठी सातत्याने नवनवीन प्रयोग राबविण्यात येत आहेत.ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ड्रोन तंत्राद्वारे विद्राव्य खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक उपक्रमशील प्रयोग राबवित असताना ड्रोनद्वारे खत फवारणी तंत्रास प्रोत्साहन दिले आहे.
त्यामुळे ड्रोनद्वारे “शाहू”च्या शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व शेतकऱ्यांनी,या फवारणीसाठी नोंदणी करावी.असे आवाहन केले. यावेळी "शाहू"ची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल व शाहूस देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. घाटगे यांचा शेतकऱ्यांच्यावतीने सरपंच रेखाताई माळी यांच्यासह शेतकऱ्यांनी सत्कार केला.
बिद्रीचे माजी व्हाईस चेअरमन दत्तामामा खराडे,माजी संचालक सुनिलराज सुर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहूचे संचालक डी.एस.पाटील,शाहू कृषिचे चेअरमन अनंत फर्नांडीस,सरपंच रेखा माळी,रामभाऊ खराडे,रविराज पाटील,विलास गुरव,संजय चौगुले,चातक इनोवेशनचे विजय शिंदे आदी उपस्थित होते.
स्वागत ऊस विकास अधिकारी के.बी.पाटील यांनी केले.शाहू कृषिचे व्हाईस चेअरमन अरूण शिंत्रे यांनी आभार मानले.
कृतज्ञता ‘शाहू’च्या कर्मचाऱ्यांची
श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना त्रिपक्षीय समितीने जाहीर केलेली १२ टक्के वेतनवाढ माहे डिसेंबर २०२१ पासून लागू केली आहे.त्याबद्दल राजे समरजितसिंह घाटगे यांचा शाहू ग्रुपमधील मुरगुड परिसरातील शाहूच्या कर्मचाऱ्यांच्या आकर्षक श्री महालक्ष्मीची चांदीची मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.