बातमी

उज्ज्वला योजनेने केला रॉकेलचा पुरवठा बंद !

साके(सागर लोहार) : गरिबांच्या हितासाठी शासन अनेक कामे करीत असल्याचा समाजमाध्यमातून प्रचार करीत असते. मात्र गरिबांच्या विकासासाठी असलेल्या कित्येक योजना फोल ठरत आहे. अशाच उज्वला योजनेचा फटका जनतेला बसला असून, आता गरिबांची चूल व दिवाही बंद पडला आहे. शासनाने सुरू केलेल्या उज्वला गॅस योजनेमुळे गोरगरिबांना केला जाणारा रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला आहे.

तर सिंलिडरची किंमतही वाढल्यामुळे योजनेअंतर्गत देण्यात आलेले सिंलिडर शो पीस म्हणून घरात पडून आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा जळन तोडण्याकडे वळाले आहेत. कागल तालुक्यात एकुण 57 हजार 336 कार्डधारक असुन 101 रास्त भाव दुकाने आहेत. गेल्या चार महिन्यांपासून या कार्ड धारकांचा रॅाकेल पुरवठा अचानक बंद केला आहे. तो पुन्हा सुरू करण्याची मागणी कार्ड धारकातून होत आहे.

देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरून तो महिलांच्या फुफुसात जात असून अनेक महिलांना विविध विकाराचा सामना करावा लागतो. तसेच दमा व इतर आजारांनाही महिलांना बळी पडावे लागते. त्यामुळे शासनाने उज्वला योजना आणून ९० टक्के घरामध्ये गॅस सिलिंडर पोहोचविला.

यासाठी मात्र गरिबांचे हक्काचे केरोसीन बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चिमनिभर रॉकेलसाठी इकडे – तिकडे भटकावे लागत आहे. ग्रामिण भागात सुरू झालेले लोडसेडींग, सरपण पेटविण्यासाठी व शेतातील घरात शेतकरी रॉकेलचा दिवा पेटवीत होते. मात्र, आता रॉकेल पुरवठाच बंद करण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांना विविध अडणींचा सामना करावा लागत आहे. विजेची समस्या झाली तर, शहरात बॅटरी व इन्व्हर्टरचा उपयोग करतात. मात्र अठराविश्व दारिद्र्य अवस्था असलेल्या गोरगरीब जनतेच्या घरात चिमणीभर रॉकेल सुद्धा मिळत नाही हे गरीबांचे दुर्दैव म्हणावं लागेल.

कागल तालुक्यात चार महिने रॅाकेल पुरवठा बंद, पुरवठा सुरू करण्याची नागरिकांची मागणी

पूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरात रॉकेलचा दिवा पेटविला जात होता. परंतु आता रॉकेल बंद केल्याने हे दिवेही दिसेनासे झाले आहेत. शेतीला सिंचन करण्यासाठी काही शेतकर्‍यांनी शेतात इंजिन बसविले आहे. या इंजिनमध्ये रॉकेल टाकल्यावर सिंचन करता येत होते. मात्र रॉकेलअभावी आता हे इंजिन शेतातच धूळखात पडले आहे. एखादी व्यक्ती रात्री अपरात्री मरण पावल्यास अग्नीदेण्यासाठी रॅाकेल मिळत नसल्याने पर्यायाने पेट्रोल,डिझेल आनण्यासाठी पेट्रोलपंप शोधावे लागत आहे. तेही रात्री 12 नंतर बंदच असतात त्यामुळे प्रत्येक कार्ड धारकांना रॅाकेल मिळणे गरजे आहे.

कारण डिझेलचे दर सुद्धा गगनाला भिडले आहे. शासनाने व वनविभागाने जंगलतोड रोखावी यासाठी ही योजना अंमलात आणली. अनेक महिलांना या योजनेअंतर्गत गॅसचे वाटपही करण्यात आले. तसेच सध्या सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यात सबसिडी बंद त्यामुळे महिला पुन्हा सरपण गोळा करण्यासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र दिसून येते. दर महिन्याला सिलिंडरच्या दराचा महागाईचा भडका उडत आहे. आज रोजी घरगुती सिलिंडर 930 रुपयात मिळत आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा चुलीकडे वळाल्या असून रॅाकेल पुरवठा कराव अशी मागणी सध्या कार्ड धारकातून होत आहे.

कार्ड धारकांनी मागणी करावी
ग्रामीण कार्डधारकांची रॉकेल मिळावे ही मागणी रास्त आहे परंतु जिल्हा केरोसिन मुक्त करण्याचा शासन निर्णय असल्यामुळे रॉकेल पुरवठा बंद झाला आहे. शिवाय वेळोवेळी मागणी करूनही धान्य दुकानदारा मार्फत कार्डधारकांनी रॉकेल मिळावी अशी कोणतीही मागणी आमच्याकडे अद्याप केलेली नाही. शिल्पा ठोकडे : तहसिलदार, कागल

रॅाकेल पुरवठा सुरू करावा….
ग्रामिण भागात सध्या लोडसेडिंग सुरू झाले आहे. गॅस दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात सरपण पेटविण्यासठी रॅाकेल आवश्यक असून लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून तालुक्य़ाचा रॅाकेल पुरवठा पुन्हा सुरू करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *