मुरगूड ( शशी दरेकर ) : लोक जागृतीतून लोकांची मने स्वच्छ करण्याचे कार्य करतांनाच अंध:श्रध्देला मुठ माती देण्याचे कार्य गाडगेबाबांनी केले म्हणून त्यांना केवळ स्वच्छते पुरते मर्यादित ठेवू नका . असे प्रतिपादन कॉ संपत देसाई यांनी केले.
ते येथील वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतिने संत गाडगेबाबा पुण्यदिनानिमित्य कष्टकरी ज्येष्ठांचे सत्कार , निराधार निराश्रीतांना ब्लँकेट वाटप ,झुणका भाकर प्रसाद अशा संयुक्त कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.
निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबाचे आचार, विचार आणि आजची वर्तमान स्थिती या विषयावर त्यांनी मांडणी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विजयमाला मंडलिक गर्ल स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा पाटील यांनी भूषविले होते. तर प्रा . आनंद चव्हाण गारगोटी व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मा.ग . गुरव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी हे वनश्री मोफत रोपवाटीकेच्या माध्यमातून २००४ पासून संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्य विविध उपक्रमांचे आयोजन करतात . या उपक्रमांचे हे २० वे वर्ष आहे. यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
स्वागत सचीन सुतार प्रास्ताविक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी सुत्रसंचालन प्रतिक्षा पाटील तर आभार प्रा. चंद्रकांत जाधव यांनी मानले. यावेळी बाबासो मुल्ला , गुलाब जमादार ,श्रीमती कमळाबाई डवरी, आप्पासो ताशिलदार,मारुती खंडागळे, तुकाराम सुतार, द्रौपदी कांबळे, सुरेश विभुते तेली या कष्टकरी ज्येष्ठांचे सत्कार मानाचा फेटा, शाल, सन्मानपत्र व रोप देवून करण्यात आला.
तसेच ऑनलाईन शिक्षण पद्धती या पुस्तकास पाच पुरस्कार मिळाल्याबद्दल पुस्तकाचे लेखक गटशिक्षणाधिकारीसो डॉ जी बी कमळकर तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ स्नेहा चव्हाण यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच २५ वर्षात सव्वा चार लाख रोपांचे मोफत वाटप करणाऱ्या वनश्री रोपवाटकीमध्ये सातत्यपूर्ण काम करणाऱ्या सौ वंदना वाडेकर व सौ कल्पना मोहिते यांचा रोपवाटिका संचालिका सौ नीता सूर्यवंशी व संचालक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या हस्ते साडी – चोळी व मानाचा फेटा आणि शाल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून वृद्ध सेवाश्रम वंदूर साठी रोपवाटिकेच्या वतीने ब्लॅंकेट व धान्य देण्यात आले . त्याचा स्विकार वृद्धाश्रम चालिका विमलताई सुतार यांनी केला.
या कार्यक्रमास मुरगूडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, हाजी बाळासाहेब मकानदार, माजी नगरसेवक सुहास खराडे , व्यापारी नागरी सह . पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, लाडू सप्लायर्स राजाराम चव्हाण , युवा उद्योजक मयूर आंगज , बहुजन जनजागृती संस्थेचे संस्थापक एम.टी. सामंत, विशाल पाटील, प्रदिप वर्णे, संभाजी भोसले , सौ. सुमन अनावकर, विश्वनाथ शिंदे ,पोलीस पाटील तुकाराम परीट, प्रदिप सुर्यवंशी , प्रमोद शिंगारे,अरुण सावर्डेकर आदींसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी झुणका भाकर प्रसादाचा सुमारे अडीचशे लोकांनीं लाभ घेतला.