पोलिसांसमोर आव्हान
कागल (प्रियदर्शन पाटील) : कागल तालुक्यात सध्या जुन्या दुचाकी गाड्या चोरण्याचे फॅड आले आहे. यामाहा कंपनीच्या आर एक्स १००, सुझुकी कंपनीच्या मॅक्स १००, सामुराई, बजाज के.बी, चॅम्पियन अशा गाड्या रात्रीच्या वेळी घरासमोरून चोरून नेल्या जात आहेत. यामुळे पोलिसां समोर आव्हान निर्माण झाले आहे.
मुळात अशा जुन्या गाडी चोरण्या मध्ये विशेष म्हणजे या गाड्यांचा आवाज ! होय या टू स्ट्रोक जुन्या गाड्यांना मोठा आवाज असतो. छपरी तरुणांमध्ये अशा गाड्या पळवण्याचे वेड कोल्हापुरातून आता कागलच्या ग्रामीण भागात पसरले आहे. विशेषतः कागल शहर, मौजे सांगाव, कसबा सांगाव, लिंगनूर, रेंदाळ, हुपरी परिसर, इथे अशा गाड्या चोरट्यांनी उछाद मांडला आहे. अशा गाड्यांचे सायलेन्सर काढून अथवा बदलून कर्कश आवाजात पळवल्या जातात. या गाड्या अनेक उत्सव, मिरवणूका, नेत्यांचे वाढदिवस यावेळी या गाड्या रस्त्यावरून मोठ्या आवाजात पळवल्या जातात. तसेच अशा दुचाकीच्या स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत. जी गाडी जास्त कर्कश आवाज करेल ती जिंकते. एखाद्या डॉल्बी सिस्टीमच्या दुप्पट अशा गाड्यांचा आवाज असतो. यावर पोलीस कारवाई करू शकत नाहीत. कारण छपरी तरुण या गाड्या वेगाने पळवत गर्दीत मिसळत पळून जातात.
या टू स्ट्रोक जुन्या गाड्यांवर भारत सरकारच्या परिवहन मंत्रालयाने २००० सालापासून बंदी घातली आहे. बी.एस गाड्यांची सिरीज सुरु झाल्यावर या टू स्ट्रोक दुचाकी रस्त्यावर आणण्यास बंदी आहे. कारण या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू व ध्वनी प्रदूषण होत होते. त्यामुळे अशा गाड्या स्क्रॅप करण्याचे आदेश आरटीओला दिले आहेत. पण अजूनही काही लोक अशा गाड्या वापरत आहेत. यामाहा कंपनीच्या आर एक्स १००, सुझुकी कंपनीच्या मॅक्स १००, सामुराई, बजाज के.बी, चॅम्पियन या गाड्या दुर्मिळ आहेत. अशा गाड्या क्वचितच लोकांच्याकडे आहेत. त्यामुळे हे छपरी तरुण गँग अशा गाड्या दिवसा हेरून ठेवतात व रात्रीच्या वेळी घरा समोरून चोरून नेतात. पोलिसांना पण या गाड्यांचा सुगावा लागत नाही. याचे कारण म्हणजे चोरून आणलेली अशी गाडीचे रंगरूप पालटले जाते. तिचा रंग, बाहेरील पेट्रोल टाकी, गार्ड, पॅनेल इतके बदलले जातात की खुद्द त्या गाडीचा मूळ मालक तिला नंतर ओळखू शकत नाही. तसेच पोलीसही सराईत गाडी चोरट्यांच्या मागे असतात. पण हे गाडी चोरटे सराईत नसून छपरी, मिसरुट न फुटलेले तरुण पोरे आहेत. यांचा सुगावा लागणे अवघड असते. त्यामुळे अशा गाडी मालकांनी आपल्या गाड्या रात्री घरात नेऊन लावाव्यात.