बातमी

गोरगरिबांच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागलमध्ये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप

कागल : गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जोपर्यंत या जनतेचे आशीर्वाद पाठबळ आणि परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कसलाही धक्कासुद्धा लागणार नाही, असेही ते म्हणाले.

कागल मधील बहुउद्देशीय हॉलमध्ये तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या २०० लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.

भाषणात श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, विशेष सहाय्य मंत्री म्हणून काम करीत असताना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत प्रभावीपणे राबविली. समाजातील विधवा, परित्यक्त्या, अंध, दिव्यांग, मंतीमंद आणि डोंगराएवढे दुःख असलेले ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक माझ्या डोळ्यासमोर होते.

प्रास्ताविकात भैय्या माने म्हणाले, मुश्रीफ हे समाजातील दुर्लक्षित उपेक्षित गोरगरीब जनतेचे नेतृत्व आहे. गेल्या ३०-३५ वर्षातील त्यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल गोरगरीब माणसाला केंद्रस्थानी ठेवून झाली आहे.

आमदार असावा मुश्रीफांसारखा….
आणूर येथील ज्येष्ठ नागरिक व योजनेचे लाभार्थी शंकर नरके म्हणाले, गोरगरीब जनतेची काळजी वाहणारा आमदार असावा हसन मुश्रीफ यांच्यासारखा आणि त्यांच्या पाठीशी हिमालयासारखे खंबीर राहणारी जनता असावी कागलच्या जनतेसारखी

यावेळी व्यासपीठावर तहसीलदार शिल्पा ठोकडे, सदाशिव तुकान, बाळासाहेब दाईंगडे, राजेंद्र आमते, सातापा कांबळे, शशिकांत खोत, संजय चितारी, विकास पाटील, प्रवीण सोनुले, विठ्ठल जाधव पैलवान रविंद्र पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य कुंडलिक पाटील रा.बामणी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत समिती सदस्य सदाशिव तुकान यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार बस्तवडेचे माजी सरपंच साताप्पा कांबळे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *