कागल पोलिसात भावाची तक्रार
कागल / प्रतिनिधी – कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे विवाहित महिलेने केलेली आत्महत्या नसून तो घातपात आहे. अशी तक्रार आत्महत्या केलेल्या महिलेच्या भावाने कागल पोलीस ठाण्यात दिलेली आहे. याप्रकरणी मयत महिलेचे पती, सासू ,सासरे यांना कागल पोलिसांनी अटक केलेली आहे.
तस्लीमा सोहेल मुल्ला वय वर्षे 25 राहणार कसबा सांगाव, तालुका -कागल ,हिने गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. तस्लीमाने केलेली आत्महत्या ही नवरा, सासरा, सासू यांच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून केलेली आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. हा घातपात आहे .अशी तक्रार मयत महिलेचे भाऊ हिदातुल्ला चॉंदसाहेब भोजगर वय वर्षे 29 राहणार -खटकुळे माळ, पट्टणकोडोली. तालुका -हातकणंगले यांनी कागल पोलिसात दिली आहे.
नवरा साहिल हुसेन मुल्ला ,सासरा हुसेन नबी मुल्ला, व सासू खैरून हुसेन मुल्ला यांना कागल पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की ,मयत तस्लीमा हिला तिच्या घरच्यांनी भयंकर त्रास दिला आहे. तिला सतत हिनवले जात असे. तिने साधी कपडे घालावीत, डोके उघडे सोडून फिरायचे नाही, पै पाहुण्यांच्या समोर यायचे नाही. तिच्याबरोबर वारंवार भांडण करायचे. संगणमत करून तिला लाथ्या-बुक्क्यानी मारहाण करायची. तुझ्यासारख्या 56 मुली मिळतील. तू माहेरी निघून जा असे तिला हिनवले जायचे. माहेरच्याकडील नातेवाईकांनी समजावण्याचा प्रयत्न यापूर्वी वारंवार केला गेला आहे. परंतु तुमच्या मुलीला मारून टाकलेले देखील कळणार नाही अशी सतत धमकी दिली जात असे. या सर्वांच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून, तिला आत्महत्या करणेस भाग पाडले आहे. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती करपे यापुढील तपास करीत आहेत.