कोल्हापूर, दि. 2 : जिल्हयातील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही दिव्यांग पुरुष व महिलांकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अथवा त्यांच्यासाठी खासकरुन शासनाकडून देण्यात येणारे UDID (यू.डी.आय.डी.) कार्ड जर नसेल तर अशा व्यक्तींचे नाव, त्याचा फोन नं. आणि कोणत्या गावात अथवा शहरात राहतो, त्या गाव शहराचे नाव ८१०७०४०२०२ या क्रमांकावर Whatsapp/SMS व्दारे पाठवावे किंवा संबंधीत दिव्यांग व्यक्तीला वरील नंबरवर मिस कॉल देण्यासाठी सांगावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे संबंधीत दिव्यांग पुरुष आणि महिला यांना संपर्क करण्यात येईल, तसेच त्यांना दिव्यांगासाठीच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही सुविधा ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनापासून सुरु करण्यात येणार आहे. सर्वांनी यादिवशी आवर्जून थोडा वेळ काढून संपर्कातील किंवा दिसून आलेल्या दिव्यांग बांधवासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.