बातमी

कागलमध्ये आज ‘भारत जोडो’ पदयात्रा

कागल : काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या कागल तालुक्यात आज काँग्रेस नावालाच शिल्लक आहे. पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरू आहे. त्या यात्रेला तालुक्यातून काँग्रेसचे किती कार्यकर्ते जाणार हा प्रश्न निर्माण झाला असताना भागातील शिवराज्य मंच आणि वनमित्र संघटनेने यात्रेस पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी सकाळी ९ वाजता शहरात पदयात्रेच्या समर्थन फेरीचे आयोजन केले आहे.

येथील निपाणी वेसनजीक महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून तेथून गैबी चौक आणि मुख्य रस्त्याने बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत ही फेरी निघणार आहे. शिवराज्य मंच आणि वनमित्र संघटना

या सामाजिक उपक्रम व प्रकल्प राबविणाऱ्या संघटना आहेत. तर वंदुर, येथील शिवाजीराव कांबळे हे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत.

आम्ही काँग्रेसला पाठिंबा म्हणून या भारत जोडो पदयात्रेकडे पाहत नाही. तर भारत जोडो ही आज देशाची गरज आहे. संविधान पायदळी तुडवित देशप्रेम आणि देशद्रोही यांच्या व्याख्या काही मूठभर प्रवृत्ती निश्चित करीत आहेत. जनतेला वेठीस धरीत आहेत. समाजा समाजात तेढ निर्माण करीत आहेत. यावर राहुल गांधी हे निडरपणे बोलत आहेत. जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरले आहेत. म्हणून असंख्य बिगर राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
इंद्रजित घाटगे, अध्यक्ष, शिवराज्य मंच कागल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *