कागल (विक्रांत कोरे) : धारदार हत्याराने बाहेरच्या गावात खून करून तो मृतदेह कागल तालुक्यातील बामणी येथील शेतात टाकला आहे. तो मृतदेह अमरसिंह दत्तात्रय थोरात वय वर्षे 30 राहणार गोठखिंडे तालुका वाळवा, जिल्हा सांगली याचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समजला. या खुनामुळे कागल तालुक्यात किंबहुना वाळवा तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. मयत अमरसिंह हा कोल्हापूरच्या लॉ कॉलेज मध्ये द्वितीय वर्षात शिकत होता.
या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे. बामणीचे पोलीस पाटील महादेव कुंभार यांनी कागल पोलिसात या खुनाची फिर्याद नोंदवली आहे.
कागल पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, कागल- निढोरी राज्य मार्गावर सिध्दनेर्ली नदी किनारा लगत बामणी गावच्या हद्दीतील रस्त्याकडेच्या शेतामध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला. एका झुडपात हा मृतदेह होता. ये-जा करणाऱ्या लोकांच्या नजरेस तो पडला. पोलीस पाटलांनी तात्काळ कागल पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. अमरसिंह च्या डोक्यात धारदार हत्याऱ्याने वार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज झाला. कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणाने ,डोकीत वार करून त्याला ठार मारून खुन केला आहे. बामणीच्या राजेश कोरे यांच्या शेताजवळ झुडपात आणून टाकलेल्या मृतदेहाचा पंचनामा करून शिवविच्छेदनास पाठविण्यात आला.
गोटखिंडी तालुका वाळवा येथील गावात दोन दिवसापूर्वी जोरदार बाचाबाची झाल्याचे समजते. मृतदेहाचे खिशात कोल्हापुरातील लॉ कॉलेजचे ओळखपत्र सापडले. घटनास्थळास कोल्हापूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी ,करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे, पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी भेट दिली.
या प्रकरणाचा तपास कागलचे पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे हे करीत आहेत पोलिसांच्या तपासानंतरच खुणाचे गुढ उकलणार आहे.