बातमी

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, दि. 19 : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाअंतर्गत पंचगंगा नदीची महाआरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर, कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ.कांदबरी बलकवडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, माणिक पाटील-चुयेकर आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.

नदीला माता मानण्याची भारतीय संस्कृतीची प्राचीण पुरातण परंपरा आहे. नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नदीची आरती करण्याची पध्दत संपूर्ण भारतात पाळली जाते. गंगा नदीच्या आरतीप्रमाणेच या ठिकाणी पंचगंगा नदी आरतीचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी काडसिध्देश्वर स्वामीजींना धन्यवाद दिले.

या कार्यक्रमाद्वारे पाणी, ध्वनी प्रदुषण टाळूया, पाण्याच्या, उर्जेचा अतिरिक्त वापर टाळूया, गरजेपूर्तेच वाहने वापरूया, माती आणि वृक्ष याचे संवर्धन करूया असा संदेश देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ज्या आग्रा येथील लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सडेतोड उत्तर दिले तिथे महाराजांची जयंती साजरी होणे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

यावेळी पंचगंगा नदीच्या आरतीने सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची अनौपचारिक सुरूवात झाली असून येत्या 7 दिवसात 30 ते 40 लाख लोक यासाठी उपस्थित राहतील, असा विश्वास श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी या लोकोत्सवात मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *