24/09/2022
0 0
Read Time:5 Minute, 25 Second

साके येथील बाळासाहेब तुरंबे यांचा ऊसशेतीत यशस्वी प्रयोग

साके :   सागर लोहार
साके तालुका कागल येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब परसू  तुरंबे यांनी एकरी  35 ते 40 टनावरुन दुसऱ्याच वर्षी तब्बल एकरी 81 टनापर्यंत ऊसाचे विक्रमी उत्पन्न घेवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

यासाठी त्यांनी बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्या अंतर्गत ऊस विकास योजनेतून येथील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्ही खतांचा तज्ञांच्या सल्ल्याने योग्य वापर करीत त्यांनी हे यश संपादन केले असून आता त्यांचा पुढील दोन वर्षात एकरी 100 टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याचा मानस आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रयोग करताना त्यांचा एकरी उत्पादन खर्च देखील सात ते दहा हजारांनी कमी केला आहे.

तुरंबे यांनी आपल्या गट नंबर 1451 (बेलवळे रस्ता) या शेतामध्ये 5 अॅाक्टोबर 2020 रोजी 86032 या ऊसाच्या जातीची लागण केली. त्यामध्ये त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या अंतर्गत ऊस विकास योजनेतील आदर्श प्लॅाट योजना राबवून त्यांनी आधुनिक नवतंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली.

त्यामुळे त्यांना या ऊस क्षेत्रात एकरी 35 टन मिळणाऱ्या क्षेत्रात  81.423 टन व 24 गुंठे क्षेत्रावर 48.854 टन इतके ऊसाचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे.

या विक्रमी ऊस उत्पादन वाढीसाठी तुरंबे यांनी  रासायनिक खतांचा खर्च कमी करून ऊस दोन महिन्यांचा असताना व बाळभरणीला ऊसमळी, शेणखत व औषधे यांचा तज्ञांच्या सल्ल्याने योग्य वापर केला.

यामुळे उसांच्या पेरांची संख्या 30 ते40 ,तर कोबांची संख्या 15 ते 20 होती. जमिनीचा पोत सुधारून ऊसाच्या पांढ-या मुळ्यांची भरपूर वाढ झाली. फुटव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवून पानांची काळोखी वाढली.

त्यामुळे येणा-या ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात कांड्याची संख्या वाढवून ऊसाचे वजन भरपूर वाढले. चार फुटांवर सरी पद्धत, तेरा दिवसाच्या अंतराने स्वत:च्या विहिरीचे पाणी देवून वेळेवर फवारण्या,खतांचे योग्य नियोजन करून जमीन कसदार बनवण्याचा प्रयत्न केला.  

तुरंबे यांनी कारखान्या अंतर्गत अनेक उपक्रमशील योजना प्लॅाटमध्ये राबविल्या आहेत. त्यातीलच ही एक ‘आदर्श प्लॅाट योजना’ या योजनेअंतर्गत माती परिक्षण, बियाणे निवड मशागत,सेंद्रिय,रासायनिक खते,किड व रोग नियंत्रण औषधे व पाणी नियोजन या सगळ्या गोष्टींची माहिती कारखान्याच्या शेती अधिकारी वर्गाकडून नेहमीच त्यांना मिळाली.

या ऊस विकास योजना राबविण्यासाठी कारखान्याचे संस्थापक ग्रामविकासमंत्री हसनसो मुश्रीफ साहेब,कारखान्याचे चेअरमन, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच शेती अधिकारी प्रताप मोरबाळे, ऊस विकास अधिकारी उत्तम परिट, शेती मदतनिस सुरेश आगळे यांचे सहकार्य लाभले.

दोन वर्षांपूर्वी मला ऊसाचे एकरी 35 ते 40 टन उत्पादन मिळत होते शिवाय उत्पादन खर्चही जास्त होता परंतु घोरपडे कारखान्यांच्या तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पहिल्या वर्षी एकरी 35 टनावरुन 61 टनापर्यंत  पोचलो आहे. आत्ता 81 टनावर मजल मारली असून पुढील वर्षी एकरी 100 टनापर्यंत पोहचण्याचा माझा मानस आहे. बाळासाहेब तुरंबे,शेतकरी साके.

तिहेरी संगम….
बाळासाहेब तुरंबे हे पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच तालुका संघाचे माजी चेअरमन व गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी असून  त्यांनी शेतीमध्ये सुद्धा असे नवनवीन प्रयोग करून राजकारण, समाजकारण करीत तिहेरी संगम साधला आहे.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!