बातमी

वृत्तपत्रांच्या निकोप वाढीसाठी निस्वार्थी झटणारे जेष्ठ संपादक नेते : आप्पासाहेब पाटील

सांगलीचे ज्येष्ठ संपादक आप्पासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर ज्या कामात ते हात घालतात अथवा जे काम हाती घेतात ते तडीस नेण्यासाठी तन,मन,धनासह अपार कष्ट व अभ्यास करीत असतात. यामुळे आप्पासाहेब पाटील यांचे व्यक्तिमत्व सर्वांना हवेहवेसे वाटते. ज्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल, त्या क्षेत्रातील बारकांव्याचा अभ्यास करून अनेकांना मदत करायची हा आप्पासाहेबांचा स्थायीभाव असल्यामुळे आप्पासाहेब पाटील यांचा महाराष्ट्रभर मित्रपरिवार फार मोठा आहे. सांगली जिल्हा युवक अध्यक्ष, सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ते ज्येष्ठ संपादक असा आप्पासाहेब पाटील यांचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा व अभ्यासपूर्ण आहे. या प्रवासामध्ये आप्पासाहेबांना जो मित्रांचा गोतावळा लाभला तो क्वचितच एखाद्याच्या नशिबी असतो, असे म्हणावे लागेल. आप्पासाहेब पाटील ( मो. 8855915588)

तारुण्यामध्ये आप्पासाहेब पाटील यांनी सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे काम सुरू केले. हा सार्वजनिक जीवनातील आप्पासाहेबांचा श्री गणेशा होता. यानंतर काँग्रेस पक्षामध्ये अनेक पदे भूषवित असताना आप्पासाहेब पाटील यांनी सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेस सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर या कालखंडामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना शासनास केला होत्या.

त्याचा स्वीकार तत्कालीन सरकारने करून बरेच बदल करून घेतले आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रांना एमआयडीसींना ऊर्जीत अवस्था आणण्यामध्ये आप्पासाहेब पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. छोट्या मोठ्या उद्योगांना जे सहकार्य हवे, ज्यांच्या अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी आप्पासाहेब पाटील यांनी औद्योगिक महामंडळाचे संचालक असताना केलेले काम अनेकांच्या आजही स्मरणात आहे. त्याचबरोबर या महामंडळाच्या सदस्यपदी असताना अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. अनेकांना नोकरी मिळवून दिली आहे. सार्वजनिक जीवनातील आप्पासाहेबांचे वावरणे हे निष्कलंक व निस्वार्थी असल्यामुळे अनेकांशी त्यांचा जो ऋणानुबंध गेल्या अनेक वर्षापासून निर्माण झाला आहे. तो आजही पहिल्यासारखा तसाच घट्ट व परिपक्व आहे.

सांगली जिल्हा युवक समाचार हे वृत्तपत्र आप्पासाहेब पाटील यांनी काँग्रेस चळवळीला सांगली जिल्ह्यात अधिक बळकटी देण्यासाठी सुरू केलेले वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून आप्पासाहेब पाटील यांचा पत्रकारितेशी संबंध आला. तेव्हापासून लहान व मध्यम वृत्तपत्रांचे प्रश्न जाणून घेऊन ते शासन स्तरावर सोडवण्यासाठी आप्पासाहेब पाटील यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद व गौरवास्पद असे आहेत. यामुळे महाराष्ट्रातील छोट्या व मध्यम वृत्तपत्राचे संपादक मालक हे नेहमीच आप्पासाहेब पाटील यांच्या प्रत्येक सूचनेचा आदरपूर्वक विचार करतात.

आप्पासाहेब पाटील करीत असलेल्या कामांमुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. शासन स्तरावर मंत्री महोदयांपासून शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सातत्याने निवेदन देणे, बैठका घेणे, प्रत्येक प्रश्न समजावून सांगून कशा पद्धतीने अडचणीचा ठरत आहे. यातून वृत्तपत्र कशी अडचणीत येतात. हे शासनाला पटवून देण्यात अप्पासाहेब पाटील नेहमीच यशस्वी झालेले आहेत. केवळ आणि केवळ आप्पासाहेब पाटील यांच्यामुळेच लहान व मध्यम वृत्तपत्रांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. हे धाडसाने येथे नमूद करीत आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकार, संपादक, मालक संघटना आहेत. मात्र प्रत्यक्ष प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पदरमोड करून काम करणारे आप्पासाहेब हे एकमेव आहेत.

शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आप्पासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते. कोणताही प्रश्न शासन स्तरावर मांडताना वरकरणी व वरवर मांडायचा नाही. तर त्या प्रश्नांचा सर्वांगीण व चौफेर अभ्यास करून शासन स्तरावर मांडल्यामुळे नेहमीच आप्पासाहेब पाटील यांनी मांडलेले प्रश्न, समस्या निकाली निघालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्राच्या अनुषंगाने अनेक संघटना कार्यरत आहेत. मात्र कोणत्याही संघटनेबद्दल ब्रशब्द न काढता,

आपण जे काम हाती घेतले आहे. ते इमाने इतबारे प्रामाणिकपणे करायचे. हा आप्पासाहेबांचा स्वभाव असल्यामुळे इतरांच्या कामात कधीच ते हस्तक्षेप करीत नाहीत. आपल्या प्रमाणेच किंबहुना कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी कोणताही प्रश्न सोडविला तर आप्पासाहेब पाटील यांना नेहमीच समाधान होत असते. कारण या ना त्या कारणाने प्रश्न कोणी सोडवला, याच्यापेक्षा प्रश्न मार्गी लागला, यामध्ये समाधान मानणारे आप्पासाहेब पाटील आहेत. आजही वयाच्या 78 व्या वर्षी युवकाला लाजवतील असे काम आप्पासाहेब पाटील करीत आहेत. वास्तविक पाहता एक गोष्ट येथे अधोरेखित करावी लागेल. आप्पासाहेब पाटील यांनी सांगली जिल्हा युवक समाचार हे वृत्तपत्र सुरू केले. त्याचप्रमाणे युवकाला लाजवेल अशी आप्पासाहेब पाटील यांचे काम करण्याचा जोश व उत्साह सातत्याने सुरू आहे.

महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद या संघटनेच्या माध्यमातून तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय राजू पवार यांच्याबरोबर आप्पासाहेब पाटील यांनी वृत्तपत्रांच्या कामासंबंधीने सार्वजनिक काम सुरू केले आणि आजही तितक्याच तत्परतेने, कार्यक्षमपणे हे काम ते करीत आहेत. प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे आप्पासाहेब पाटील मार्गदर्शक संस्थापक आहेत. तसेच असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या कानपूर स्थित अखिल भारतीय स्तरावरील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आप्पासाहेब पाटील यांनी केलेले काम अतिशय उत्कृष्ट व चांगले आहेत. तर सध्या याच संघटनेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष झालेले आहेत.

महाराष्ट्रातील वृत्तपत्रांबरोबरच देश पातळीवरील विविध भाषिक वृत्तपत्रांचे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत मांडण्यासाठीही आप्पासाहेब पाटील यांचा नेहमीच पुढाकार असतो. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष केशव दत्त चंडोलाजी व उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील हे दोन ज्येष्ठ संपादक महाराष्ट्र व देशातील वृत्तपत्रांच्या प्रश्नासंबंधी संवेदनशील आहेत.

आप्पासाहेब पाटील हे व्यक्तिमत्व म्हणजे शांत, संयमी, अभ्यासू, निस्वार्थी, प्रत्येकाला मदतीचा हात देणारे, कौटुंबिक वात्सल्य जपणारे, मुलांच्यावर सुसंस्कार करणारे, राज्यातील व देशातील वृत्तपत्रांची निकोप वाढ व्हावी यासाठी झटणारे, वृत्तपत्र, संपादक, पत्रकार यांच्याबाबत संवेदनशील व्यक्तिमत्व, जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, असे सृजनशील व्यक्तिमत्व म्हणून आप्पासाहेब पाटील यांच्याकडे संपूर्ण वृत्तपत्र क्षेत्रातील ज्येष्ठ, कनिष्ठ, नवोदित संपादक पत्रकार पाहतात. आज आप्पासाहेबांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! अभिष्टचिंतन..!

गोरख तावरे (9326711721)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *