बातमी

राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनास उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास कोल्हापूरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. दि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणाऱ्या या ग्रंथप्रदर्शनाचे, कोल्हापुरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक किरण गुरव आणि सोनाली नवांगुळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले .

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी .टी शिर्के, विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आदी उपस्थित होते.

न भूतो न भविष्यते

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून शाहू महाराजां बद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे. जिल्हावासियांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट देवून याचा लाभ घ्यावा तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेले विशेष ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार असून करवीरवासियांनी त्याला, ‘ न भूतो न भविष्यते ‘ असा प्रतिसाद द्यावा . असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले.

उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिर्के व जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध ग्रंथ प्रकाशक व वितरकांच्या स्टॉल्सची पाहणी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावरील ११० ग्रंथांचे शिवाजी विद्यापीठाचे विशेष दालन तर करवीर नगर वाचन मंदिरातील महाराजांवरील ४० पुस्तके हे या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या ग्रंथ प्रदर्शनात राज्यभरातील सुमारे ५८ प्रकाशक सहभागी झाले असून एकूण ९५ स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्याद्वारे या प्रदर्शनात सुमारे ५० हजारांहून अधिक ग्रंथ वाचकांना पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच या प्रदर्शनामध्ये शाहू महाराजांच्या जीवनावरील ४४ प्रकाशित प्रबंध आणि संशोधन उपलब्ध आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या ज्ञान महोत्सवात विविध बुक स्टॉलकडून, वाचकांना पुस्तक खरेदीवर १० ते ४० टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट देण्यात येणार आहे. या संधीचा लाभ वाचकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अध्यात्मिक, क्रीडा, संशोधन, स्पर्धा परिक्षा, ऐतिहासिक कथा – कांदबऱ्या, चरित्रे / आत्मचरित्रे, बाल साहित्य, इंग्रजी साहित्य तसेच पाककृती, आरोग्य, धार्मिक आदी पुस्तकांचा समावेश आहे .

सकाळच्या सत्रात उद्घाटनानंतर जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या ग्रंथ प्रदर्शनाला उपस्थिती दर्शविली . कोल्हापूरवासियांनो ! पुस्तकाचा – मस्तकाशी संबंध जोडण्यासाठी या प्रदर्शनाला येताय नव्हं ! नव्हं – नव्हं, यावंच लागतयं !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *