लहान मुलांच्या आरोग्याशी खेळखंडोबा;
पुरवठा केलेले अन्न साहित्य निकृष्ट दर्जाचे
कागल : कागल परिसरातील काही शाळेतील दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात वाढत्या मिठाने अन्न खारट झाले आहे. या जेवणात वापरण्यात येणाऱ्या चटणी मध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असल्याने अन्न खारट होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. यातून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळखंडोबा होत आहे. तसेच यासाठी पुरवठादार व ठेकेदार यांच्यावर देखील पुरवठा केलेले अन्न साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप वारंवार होत आहेत.
तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ‘सर्व शिक्षा अभियान’ अंतर्गत प्राथमिक शाळेतील मुलांची होणारी गळती रोखण्यासाठी शालेय पोषण आहार ही योजना सर्व राज्यात अंमलात आणली. यानुसार शाळेतच लहान मुलांना दुपारच्या वेळेत जेवण देण्यात येते. यासाठी राज्य सरकार व पंचायत समिती खाजगी पुरवठादार व ठेकेदार यांना टेंडर देऊन अन्न साहित्यची पुरवठा जबाबदारी देते. पण बऱ्याच काळापासून पुरवठादार व ठेकेदार यांच्यावर पुरवठा केलेले अन्न साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप होत आहेत. त्यातच सध्या कागल मधील काही शाळांमध्ये जेवणात वापरण्यात येणाऱ्या चटणी मध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असल्याने अन्न खारट होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या चटणी बाबत कागल पंचायत समिती सदस्यांनी विरोध दर्शविला होता. पण अजूनही ही चटणी शाळेतील दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात वापरली जात आहे.
ज्यादा मिठामुळे आरोग्याच्या समस्या !
अन्नामध्ये मीठ खूप महत्वाचे आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. मीठाचं जेवणातील योगदान गरजेचं तर आहेच पण अति प्रमाणात मीठ खाल्ल्याने अनेक आजार होता. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना नेहमी कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच किडनी, हृदय, हाडे यावर देखील अति मिठामुळे प्रतिकूल परिणाम होतो असे वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले आहे.