बातमी

पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” मोहीम

कोल्हापूर, दि. 22 : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू केली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतंर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून ही मोहीम देशभर राबविण्यात येत आहे. यासाठी “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” नावाची मोहीम दि. 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत देशभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतक-यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पी. एम. किसान नोंदणीकृत साधारणपणे 5 लाख लाभार्थी आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेणारे 2.85 लाख कर्ज खाती आहेत. जिल्ह्यामध्ये अद्यापही किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी दि. 24 एप्रिल, 2022 रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहे. या विशेष ग्रामसभेत पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करण्यात येणार आहेत.

संबंधित सर्व बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील. यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणे तसेच या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत. या मोहिमेचा सर्व वंचित शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *