कागल : येथील कागल सांगाव मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास दत्त कॉलनी मधील बंगल्याच्या दाराचा कडी कोयंडा उचकटून बंगल्यात प्रवेश करून ३१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांची रोकड असा सुमारे १७.४७ लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला याबाबतची फिर्याद शंकर घाटगे (रा. दत्तनगर, कागल) यांनी कागल पोलिसांत दिली.
कागल-सांगाव रोडवर दत्तनगर येथे शंकर घाटगे यांचा रत्नाई बंगला आहे. त्यांच्या शेजारीच त्यांच्या भावाचा बंगला आहे. त्या ठिकाणी त्यांचे वडील झोपले होते. शनिवारी मध्यरात्री ते घराला कुलूप लावून शहरातील दुसऱ्या घरी आईकडे गेले होते. त्यांच्या घरातील इतर सदस्य पर्यटनासाठी गेले होते.
हीच संधी साधून चोरट्यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास घाटगे यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. बेडरूममधील तिजोरीचे कुलूप तोडून आतील रोख २ लाख ५० हजारांची रोकड आणि ३१ तोळे सोने आणि चांदीचे दागिने असा १७ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
घाटगे हे सकाळी पुन्हा बंगल्याकडे आले असता, चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी या घटनेची माहिती कागल पोलिसांनी दिली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय अधिकारी नवले, पो. नि. ईश्वरा ओमासे, उपनिरीक्षक रविकांत गच्चे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे शेष मोरे, सपाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकास पाचारण केले होते; परंतु श्वान घरापासून नजीकच्या रस्त्यावरच घुटमळले.