सिद्धनेर्ली (श्रद्धा पाटील) : सिद्धनेर्ली (ता.कागल) येथील ग्रामपंचायतीने ‘कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा’ अशी अभिनव योजना मिळकत धारकांसाठी जाहीर केली आहे. संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना एक लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ बाराशे हून अधिक मिळकतधारकांना होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकत्याच मासिक सभेत घेण्यात आला, अशी माहिती सरपंच दत्तात्रय पाटील यांनी दिली.
गतवर्षी संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांसाठी ‘कर भरा आणि सोने जिंका’ अशी अभिनव योजना ग्रामपंचायतीने यशस्वीपणे राबवली होती. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कर भरला होता. या करापोटी जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम ग्रामपंचायतीने ठेव म्हणून बँकेत ठेवली आहे. यानंतर आता विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने जनता वैयक्तिक समुह अपघात विमा म्हणून ही योजना राबवण्यात येणार आहे. वर्षभराच्या काळात मिळकतधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन अवयव गमावल्यास एक लाख रुपयांपर्यंत विमा मिळणार आहे. तर 50 टक्केपर्यंत अपंगत्व आल्यास 50 हजार रुपयापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
यावेळी उपसरपंच मनोहर लोहार, सदस्य संदीप पाटील, दशरथ हजारे, अमर पाटील, युवराज पाटील, कल्याणी कुरणे, वर्षा आगळे, संगीता पवार, रत्नपप्रभा गुरव, कुसुम मेटील, रेखा मगदूम, उज्ज्वला पवार, विद्या कांबळे, वनिता घराळ, ग्रामसेवक अजित जगताप, विजय पाटील आदी उपस्थित होते.