लेख

इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेस विरोध अन् पर्याय !

अलिकडे इचलकरंजी शहरात राहणार्‍या लोकांच्यासाठी पिण्याचे पाणी दूधगंगा नदीतून घेण्यावरून मोठा संघर्ष सुरू आहे. पंचगंगेच्या प्रदुषित पाण्यापेक्षा दूधगंगेतील पाणी थोडेसे चांगले असे वाटत असल्याने ही मागणी होत असावी. दुसरी बाजू अशी आहे, नियोजित योजनेनुसार इचलकरंजीवासियांना दूधगंगेतील पाणी देण्याने नदीकाठच्या शेतीला पाणी कमी पडणार यातून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार. या भूमिकेतून या प्रस्तावित योजनेला विरोध करण्यासाठी नदीकाठच्या गावानी मोठा संघर्ष उभा केला आहे. राज्यकर्त्यांनी यात वेळीच लक्ष घातल्यास दोन्ही बाजूच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी योग्य पर्याय निघू शकतात. त्यासंबंधी उहापोह करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

पर्याय पुढे आणण्यापूर्वी काळम्मावाडी धरण योजनेच्या लाभ क्षेत्राची माहिती घ्यावी लागेल. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे मूळ योजनेतील पाणी तरतूद पुढीलप्रमाणे आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 27.4 टी.एम.सी. यातील 4 टी.एम.सी. पाणी कर्नाटकसाठी, उरलेले 23.4 टी.एम.सी. पाणी पुढीलप्रमाणे धरण क्षेत्रातील नद्यांच्या खोर्‍यासाठी नियोजित झालेले आहे.

1) दूधगंगा खोरे 11.21 टी.एम.सी. पाणी
2) वेदगंगा खोरे 0.05 टी.एम.सी. पाणी
3) पंचगंगा खोरे 09.17 टी.एम.सी. पाणी
पंचगंगा खोरे म्हणजे पंचगंगा नदीकाठचे सर्व क्षेत्र नव्हे, मुडशिंगी ते कुरुंदवाड पुढे दत्तवाड पर्यंतचा भाग या खोर्‍यात आहे. हातकणंगले तालुक्यातील व शिरोळ तालुक्यातील काही गावांचा यात समावेश आहे. या लाभक्षेत्रासाठी कालव्याद्वारे व नदीचे पात्र यातून पाणी देण्याचे नियोजन आहे.

कालवे पूर्ण होण्यास वेळ लागणार म्हणून त्या आधी या लाभक्षेत्राला पाणी मिळावे यासाठी गैबी बोगद्यातून पंचगंगा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन झाले. या नदीतून लाभक्षेत्रापर्यंत पाणी जावे हा यात उद्देश होता. तसेच मूळ योजनेतील तरतुदीनुसार कोल्हापूर शहरासाठी असलेले 2 टी.एम.सी. पाणी या बोगद्यातून सोडले गेले. असे एकूण या बोगद्यातून 7.17 टी.एम.सी. पाण्याचा विसर्ग होतो. आता या शहरासाठी थेट पाईपलाईनची योजना कार्यान्वित झाली आहे. या पुर्ततेनंतर बोगद्यातून जाणारे 2 टी.एम.सी. पाणी बंद करावे लागेल. अशा एकंदर परिस्थितीत वर उल्लेखलेल्या इचलकरंजी पाण्यासंबंधीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सन्माननीय पुढील पर्याय उपलब्ध होऊ शकतील असे वाटते.
पर्याय नं.1: इचलकरंजी शहरास लागणारे पाणी गैबी बोगद्यातून घेऊन ते दूधगंगा नदीत सोडता येईल. हे पाणी या शहरासाठी देता येईल. दूधगंगा नदीकाठच्या शेतीचे पाण्याअभावी होणारे नुकसानही टळेल.
पर्याय नं.2: काळम्मावाडी धरणाचा डावा कालवा युद्धपातळीवर पूर्ण केल्यास त्यातून इचलकरंजीसह अनेक गावाना शुद्ध पाणी मिळू शकते. मात्र यावेळी बोगद्यातील कोल्हापूर शहराचे पाणी 2 टी.एम.सी. वगळून बाकी बोगद्यातील पाणी बंद करावे लागेल. यातून निर्माण होणार्‍या समस्येचेही निराकरण होऊ शकते.
सध्या काळम्मावाडी लाभ क्षेत्राच्या बाहेरील गावाना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे ते आवश्यकच आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्यक्रम आहेच.

कागल हातकणंगले एम.आय.डी.सी. साठी दूधगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी उचलले जाते. येथे रोजगार निर्मिती होत असल्याने या पाण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच विनातक्रार ही उचल मान्य होते.
इचलकरंजी शहर क्षेत्रही उद्योगाचे क्षेत्रच बनले आहे. या शहराला महाराष्ट्राचे ’मँचेस्टर’ म्हटले जाते. अशा स्थितीत या शहरासाठी योग्य प्रकारे पाण्याची व्यवस्था करावीच लागेल.

आता इचलकरंजी शहराची दुसरी बाजू पुढे आणू इच्छितो. ‘इचलकरंजी वासीयांनो तुम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. या शहराचे गटारीचे सर्व सांडपाणी नदीत सोडता. हे प्रदुषित पाणी पुढील गावच्या लोकांना पाजता हे कितपत योग्य आहे ? जोपर्यंत या सांडपाण्याचे जलशुद्धीकरण योजना राबविली जात नाही तोपर्यंत इचलकरंजीला शुद्ध पाण्याची मागणी करण्याचा अधिकार नाही. आधी हे करा मग पाणी मागा.’

आता आणखी एका गोष्टीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधू इच्छितो. केवळ पंचगंगाच प्रदुषित झाली आहे असे नाही. सर्वच नद्यांचे पाणी पिण्या योग्य राहिले नाही. हे कशामुळे झाले याचा शोध घ्यावा लागेल. नदीकाठच्या सर्व गावांचे सांडपाणी नदीत सोडले जात आहे. ही स्थिती सर्वच नद्यांच्या बाबतीत झाली आहे. हे थांबविण्यासाठी प्रत्येक गावाला गावच्या सांडपाण्याचे जलशुद्धीकरण करावे गेले. शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. याबाबतचे नियोजन व्हावे. त्याचबरोबर सर्व कारखान्यांनी व उद्योग समुहाने आपल्या सांडपाण्याचे जलशुद्धीकरण केले पाहिजे. याची सक्ती व्हावी. ग्रामपातळीवर होणारे जलशुद्धीकरणाचे पाणी नाममात्र शुल्क घेऊन शेतीलाही देता येईल. जलशुद्धीकरणातून टाकावू पदार्थांचे एकत्रित साठा करून योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येईल. अशारीतीने सर्व नद्यांचे पाणी शुद्ध स्वरूपात मिळू शकते.

लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. यासाठी या कामी शासनाला गांभिर्याने लक्ष घालावे लागेल. अनेक ठिकाणी नव्या वसाहती तयार होतात. या वसाहतीना मंजूरी देताना त्यांच्या सांडपाण्याचे जलशुद्धीकरण झाले पाहिजे, या अटीवर मंजुरी दिली जावी. कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरात आवश्यकतेनुसार ठीक ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रे उभी करावी लागतील त्यामुळे शहरांचे सांडपाणी नद्यामध्ये मिसळले जाणार नाही. राज्यकर्त्यांनी यावर लक्ष केंद्रित करून लोकांचे आरोग्य सुरक्षित करावे.

  • एम.आर.चौगुले
    (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक
    शेती विज्ञान मंडळ) मु.पो. कागल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *