कोल्हापूर : जन्मजात अर्भकाच्या तपासणीसोबतच ऐकू न येण्याच्या तक्रारी असतील तर तत्काळ तपासणी केल्यास पुढील अनर्थ टाळता येतो. मुलांबाबत पालकांनी न्यूनगंड सोडून त्याला ऐकू येत नाही, हे मान्य करून उपचारासाठी पाठविल्यास त्याचे भवितव्य घडेल, असे आवाहन कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. जयंत वाटवे यांनी केले.
जागतिक कर्णबधिर दिवसानिमित्त कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय आणि समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. वाटवे बोलत होते. यावेळी डॉ. एल. एस. पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील, सक्षमचे सचिव ॲड. अमोघ भागवत आणि सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम उपस्थित होते.
डॉ. वाटवे यांनी नवजात बालकांमधील आणि तीस वर्षांवरील व्यक्तींमधील श्रवणदोषाची प्रमुख कारणे यावेळी सांगितली. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता पाटील यांनीही नवजात बालकांसाठी तसेच व्यक्तींसाठी ऑडिओमीटरची तपासणीची सोय आहे, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. एल. एस. पाटील यांनी सेवा रुग्णालयातील श्रवणदोष तपासणी सेवेबद्दल माहिती दिली.
सक्षमचे सचिव ॲड. अमोघ भागवत यांनी सक्षम संस्थेची माहिती देऊन सेवा रुग्णालयातील आरोग्य सेवेबद्दल आणि दिव्यांग सेवेबाबत कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. या विभागाच्या ऑडिओलॉजिस्ट डॉ. वैष्णवी काकडे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या व्यवस्थापक मनोरमा सुंजी उपस्थित होत्या.