बातमी

प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच साकारला नागणवाडी प्रकल्प – आमदार हसन मुश्रीफ

मान्यवर व शेतकऱ्यांच्या हस्ते पाणीपूजन झाले उत्साहात

नागनवाडी : दिंडेवाडी- बारवे दरम्यानच्या नागनवाडी प्रकल्पामुळे या खोऱ्यात हरितक्रांती होईल. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच हा प्रकल्प साकारला आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. या प्रकल्पामुळे साडेतीन हजाराहून अधिक एकर शेती ओलीताखाली येईल, असेही ते म्हणाले.

भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी – बारवेदरम्यानच्या नागनवाडी प्रकल्पाचे पाणीपूजन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्यासह माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार बजरंगअण्णा देसाई, माजी आमदार के. पी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव देवणे या प्रमुख मान्यवरांसह शेतकऱ्यांच्या हस्ते झाले.

भाषणात आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, २२ वर्षांपूर्वी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या कारकिर्दीत या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर माझ्या काळात तांत्रिक मान्यता व निधी उपलब्ध केला. त्यावेळी माजी आमदार बजरंगआण्णा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते.

दरम्यान; पुनर्वसनातील तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती मिळाली. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने ३१ जानेवारी २००० रोजी या प्रकल्पासाठी १२ कोटी व १९ सप्टेंबर २०२१ रोजी या प्रकल्पासाठी ७३ कोटी निधी मंजूर झाला आहे.ज्यांनी – ज्यांनी या प्रकल्पाला योगदान दिले, त्या सर्वांना सोबत घेऊन पाणीपूजन करूया, असे मी आमदार प्रकाश अबिटकर यांना बोललो होतो. परंतु, त्यांनी एवढ्या घाईगडबडीने एकट्यानेच पाणी पूजन का केले? याचे मला आजही आश्चर्य वाटते.

त्यांचा त्याग व मोठेपणा……..
आमदार श्री.मुश्रीफ म्हणाले, पुनर्वसन करताना चार एकर स्लॅबची फार मोठी अडचण होती. लाभक्षेत्रातील शेतकरी जमिनी देण्यास अनुकूल नव्हते. तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांनी जलसंपदा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर माझ्याकडे हे खाते आले. त्यावेळी रेडीरेकनरच्या चौपट दराने हेक्‍टरी २७ लाख रुपये असे मोबदला पॅकेज मंजूर करून घेतले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जमिनीच्या बदल्यात जमीन, असा अट्टाहास न धरता मोठ्या मनाने हे पॅकेज स्वीकारले. त्यामुळेच प्रकल्प पूर्ततेचा मार्ग मोकळा झाला. त्यांचा त्याग व मनाच्या मोठेपणामुळेच या खोऱ्यात हरितक्रांती होईल.

याआधी भाजपच्या राजवटीत कृष्णा लवादाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एक थेंबही पाणी अडवले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत आंबेओहळ, उचंगी, नागणवाडी हे प्रकल्प पूर्णत्वाला आले. तसेच धामणी प्रकल्पाचेही काम सुरू झाले. या प्रकल्पावरील १० पैकी आठ बंधारे पूर्ण झाले आहेत. उर्वरित दोन बंधारेही लवकरच पूर्ण होतील. अगदी शेवटच्या प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनासह रस्ते, पूल, बंधारे हेसुद्धा पूर्ण करू, असेही ते म्हणाले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे योगदान निश्चितच महान आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसनही होणे महत्त्वाचे आहे. आमदार हसनसाहेब मुश्रीफ सोडून हे पुनर्वसन इतर कोणी करेल, असे वाटत नाही.

माजी आमदार बजरंगअण्णा देसाई म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी लोकप्रतिनिधी म्हणून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी अपार परिश्रम घेतले आहेत. या प्रकल्पामुळे दिंडेवाडी- बारवेसह हेळेवाडी, नागनवाडी मांगनूर, हसुर खुर्द, हसूर बुद्रुक हे खोरे कोरडवाहूपणाच्या शापातून कायमचे मुक्त होईल.

गारवा पुरणपोळ्या व आंबील घुगऱ्यांचा…….
पाणी पूजन कार्यक्रमाची वेळ सकाळी अकराची होती. नागनवाडीसह चिकोत्रा खोऱ्यातील माता -भगिनी सकाळी नऊपासूनच पुरणपोळ्या, केळीचा गारवा, आंबील घुगऱ्या घेऊन वाजत गाजत प्रकल्प स्थळाकडे येत होत्या. प्रमुख कार्यकर्ते व शेतकरीही मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच येत होते. आमदार श्री. मुश्रीफ यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवर व शेतकऱ्यांनी या गारव्याचा आस्वाद घेतला.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे या प्रकल्पाच्या पूर्ततेमध्ये मोठे योगदान आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या असीम त्यागातूनच आज प्रकल्पात पाणी साठलेले आहे. परंतु, हे सगळे मीच केल या अविर्भावात काहीजण दिशाभूल करीत आहेत. ही विषवल्ली काढून टाकूया.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजयराव देवणे यांनी सद्यस्थितीतील राजकारणाचा सविस्तर परामर्श घेतला.

व्यासपीठावर युवराज पाटील, मधुआप्पा देसाई, सत्यजीत जाधव, दत्ताअण्णा भोसले, सौ. शिल्पाताई खोत, शामराव देसाई, सूर्याजी घोरपडे, धोंडीराम वारके, प्रवीणसिंह भोसले, रणजीतसिंह पाटील , बाळ देसाई, सुलताननाना देसाई, उमेश भोईटे, अशोक पाटील, अंकुश पाटील, अरुण बेलेकर, ज्योती मुसळे, शिवाजी मातले, प्रताप मेंगाणे
आदी प्रमुख उपस्थित होते.

इतिहासावर माती…….
जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी सर्वांना सोबत घेऊन पाणीपूजन केले, याचे फार मोठे समाधान आहे. नागनवाडी प्रकल्पाची पूर्तता हा फार मोठा इतिहास आहे. इतिहासावर माती टाकून फक्त वर्तमानच दाखवणाऱ्यांना रोखूया. मी एकट्यानेच केले आणि बाकीचे बिनकामाचे असे वाटत असेल तर जनताच त्यांना उत्तर देईल. पाणी प्रकल्पातही आहे आणि तीन दिवसांपूर्वी घाई गडबडीने पाणीपूजन उरकलेल्यांच्या अंगातही आहे, असेही ते म्हणाले.

स्वागत माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी केले. प्रास्ताविक पिंपळगावचे सरपंच व भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार नागनवाडीचे सरपंच अशोकराव साळोखे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *