बातमी

कुरुकलीचा मातंग समाज १० वर्षे विकासापासून वंचित

मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरुकली (ता.कागल) येथील मातंग समाजाच्या विकासाचा गंभीर प्रश्न. उपस्थित झाला आहे.राज्य सरकारचा दलित फंड,दलितवस्ती सुधार योजनेचा निधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारे विकास निधी अशा सर्वच कार्यापासून या समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप करत समाजाने उपोषणाचा इशारा दिला आहे.

मंत्री मुश्रीफ,खासदार मंडलीक आणि घाटगे गटाने एकत्रित येवून गावाला अंधारात ठेवत सत्तेची खुर्ची मिळवली आहे.यापूर्वी देखील असाच प्रयोग करुन या तिन्ही गटाने गावाला पाच वर्षे मागे नेण्याचे काम केले होते.पुन्हा तोच कित्ता गिरवत सध्या कुरुकली ग्रामपंचायत प्रशासनाचा सध्या आंधळा कारभार सुरु आहे. गावात दलित वस्ती सुधारणा अंतर्गत ज्या योजना राबवायला हव्यात त्याकडे ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांनी मिळून दुर्लक्ष केल्याचा आरोप मातंग समाज करीत आहे . येथील मातंग समाजाला गेली पंधरा वर्षे ग्रामपंचायतीत सदस्यत्वच नाही.

लाक्षणीक उपोषणाचा निवेदनाद्वारे इशारा

या उलट हरिजन समाजाचे मात्र सलग पंधरा वर्षे दोन सदस्य आहेत.गेल्या पंचवार्षिक मध्ये तर हरिजन समाजातील सुशिक्षित सरपंच होते.जे सत्तेत राहिले त्यांनी केवळ खुर्चीत बसण्याचे काम केले.मातंग समाजाकडे ढुंकूंनही बघीतलेले नाही. मातंग समाजाच्या मानवी हक्कांचे एकप्रकारे शोषण करण्याचेच काम सुरु असून वीज,पाणी,आरोग्य आणि रस्ते अशा मुलभूत प्रश्नाकडे जाणून – बुजून दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप मातंग समाजाने केला आहे.गेल्या दहा वर्षात केवळ पेंव्हींग ब्लॉक चे काम वगळता एकही काम ग्रामपंचायतीने केलेले नाही. समाजात कमी दाबाचा पाणीपुरवठा,अंधारात बुडालेले रस्ते,गुडघाभर साचलेला चिखल,परिसरात साचलेले कचऱ्याचे ढीग असेच इथले चित्र पहावयास मिळते.

समाजासाठीची असणारी पिण्याच्या पाण्याची टाकी सुध्दा समाजाला विचारात न घेता काढून टाकून त्याठिकाणी शाळेचे किचनशेड बांधले आहे.लाईटची व्यवस्था सुरळीत नाही.खांबावरील बल्ब गेल्यास चार – पाच महिने ते घातले जात नाहीत.रस्ता व्यवस्थित नाही.गटारीची व्यवस्था नाही.त्यामुळे गेली दहा वर्षे हा समाज दुर्लक्षितच राहिला आहे.याकडे ग्रामविकासमंत्री तरी लक्ष देणार काय..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ते नेमके कोण…?
ग्रामपंचायतीने गेल्या दहा वर्षात मातंग समाजाच्या विकासासाठी किती निधी खर्ची घातला ? दलितवस्ती सुधार योजना,दलित फंड व १५ ℅ अनुदानाचा निधी कोठे खर्च केला ? याची माहिती समाजातील नागरीकांनी माहितीच्या अधिकाराखाली मागीतलेली असताना ग्रामसेवक प्रविण पाटील यांनी गेली चार – पाच महिने ही माहिती दिलेली नाही.ग्रामसेवकांना माहिती देवू नका म्हणून त्यांच्यावर दबाव आणणारे नेमके कोण ? हा प्रश्न सध्या उपस्थित होत असून माहिती देण्यासाठी टाळाटाळ का होत आहे.हा खरा प्रश्न आहे.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर अशोशिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे यांनी बुधवार ता.२५ मे रोजी कागल गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.कागल सारख्या पुरोगामी आणि खुद्द ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या तालुक्यात दलितांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल माध्यम प्रतिनिधीनेच उपोषणाचा मार्ग स्वीकारल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *