बातमी

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची आंबा महोत्सवास भेट

कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट राज्य कृषि पणन मंडळ कोल्हापूर आयोजित, उत्पादक ते ग्राहक या योजने अंतर्गत सुरु असलेल्या कोल्हापूर आंबा महोत्सव 2024 या ठिकाणी अमोल येडगे, जिल्हाधीकारी, कोल्हापूर यांनी सदिच्छ भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक, डॉ.सुभाष घुले यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. आंबा महोत्सवामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक आंबा उत्पादकाशी संवाद साधून जिल्हाधीकारी यांनी, ते कोठून आले आहेत, उत्पन्न किती मिळते, खर्च किती येतो तसेच त्यांना काही अडचणी आहेत काय? या बाबतची सखोल माहिती घेतली. त्यांनी आंब्यांच्या विविध जातीचे प्रदर्शन असलेल्या दालनास भेट दिऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

कृषि पणन मंडळ शेतकऱ्यांना अशाप्रकारच्या महोत्सवाच्या माध्यमातून उत्पादन विक्रीस एक नवी दिशा देण्याचे काम करीत असल्याचे सांगून, भविष्यात अजून विविध महोत्सवांचे आयोजन करावे असे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादीत होणारा गूळ, काजू, आजरा घनसाळ काळा जिरगा इ. शेतमालाच्या मार्केटिंग करिता राज्याच्या विविध शहरांच्यामध्ये असे महोत्सव आयोजित करावेत असे सुचित केले. यावेळी कृषि पणन मंडळाचे प्रतिक गोणुगडे, अनुप थोरात, प्रसाद भुजबळ, ओंकार माने, अनिल जाधव, व संदेश पिसे इ. अधिकारी उपस्थित होते.

हा अंबा महोत्सव २३ मे पर्यंत सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत १९ ते २३ मे दरम्यान कोल्हापूर आंबा महोत्सव २०२४ चे ‘भारत हौसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर’ येथे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवाची वेळ चार दिवस सकाळी ९ ते रात्री ९ असणार आहे. येथील आंबा महोत्सव मध्ये ग्राहकांना आंब्याच्या विविध जाती माहीत होण्यासाठी राज्यातील आंब्याचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहून चांगल्या प्रतीचे आंबे खरेदी करावेत त्याचबरोबर प्रदर्शनाला भेट देवून नवी माहिती अवगत करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *