बातमी

कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या माहितीसाठी ॲप व दुरध्वनीचा वापर करावा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर दि. 20 (जिमाका) : जगभरातील पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती सहजगत्या उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने भवानी मंडप येथील पागा इमारतीमध्ये नुकतेच पर्यटक सुविधा केंद्र स्थापन झाले असून या केंद्रामध्ये 02312545411 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित झाला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांशी संबंधित माहिती हवी असल्यास नागरिकांनी डेस्टिनेशन कोल्हापूर या ॲपचा वापर करावा व या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. पर्यटकांना माहिती देण्यासाठी पागा इमारतीत माहिती केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र व पर्यटक सामान सुरक्षा केंद्र स्थापन झाले असून 15 ऑक्टोबर घटस्थापनेदिवशी या केंद्राचे व डेस्टिनेशन कोल्हापूर या पर्यटन ॲपचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या विशेष उपस्थितीत झाले होते.

पर्यटक सुविधा केंद्रात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मार्फत प्रथमच चार अंध दिव्यांग युवकांना माहिती देण्यासाठी नेमले आहेत ही विशेष बाब आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व श्री अंबाबाई मंदिरातील विधी, दर्शन व्यवस्था आदी बाबतची माहिती ते येणाऱ्या भाविक व पर्यटकांना देत आहेत. आता या कार्यालयात दुरध्वनी सुविधा बसवण्यात आल्यामुळे जगभरातील पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती ॲप व दुरध्वनीद्वारे जलदगतीने मिळेल. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *