
कागल(विक्रांत कोरे) : कागल राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम गांजा विकणाऱ्या 35 वर्षीय तरुणास कागल पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाबरोबर झालेल्या झटापटीत कागल पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रभाकर पुजारी यांना दुखापत झाली आहे. वैभव विजय पाटील वय वर्ष 35 राहणार प्लॉट नंबर 299, जयसिंग पार्क ,कागल ,असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 52 हजार 65 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही घटना गुरुवार तारीख १९ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची नोंद कागल पोलिसात झालेली आहे.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वैभव पाटील हा कागल पंचायती समिती समोर राष्ट्रीय महामार्गावर स्प्लेंडर मोटर सायकल क्रमांक एम एच 09 -सी ई-6949 ही रस्त्याच्या कडेला थांबवायचा. यावेळी त्याच्याकडे ठराविक ग्राहक येऊन गांजा घेऊन जायचे ही माहिती मिळताच, पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर पुजारी यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत पुजारी यांना दुखापत झाली.
आरोपी वैभव पाटील यांच्याकडून सातशे ग्रॅम वजनाचा गांजा, स्प्लेंडर मोटर सायकल, मोबाईल व रोख रक्कम 35 65 असा एकूण 52 हजार 65 रुपयाचा मुद्दमाल पोलिसांनी जप्त करण्यात केला आहे.
अमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणे ,गुंगीकार औषधी द्रव्ये आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 एन डी पी एस अॅक्ट कलम 208 ब प्रमाणे कागल पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार आरोपीस अटक केली आहे. कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती करपे या पुढील तपास करीत आहेत.