कागल(प्रतिनिधी) : देशाच्या साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या कागलच्या श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची (shahu sugar) पंचवार्षिक निवडणूक आज सोमवारी(ता.२०) निवडून द्यावयाच्या पंधरा जागांइतकेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध झाली. कारखाना बहुराज्यीय असल्याने येत्या शुक्रवारी (दि.२४) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
विरोधी आघाडीचे सर्वसाधारण गटातून तीन व संस्था गटातून एक अर्ज शिल्लक राहिल्याने या निवडणूकीचे काय होते. याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या निधनानंतर होणारी ही दुसरी निवडणूक असून या निमित्ताने चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वावरील विश्वासही दृढ झाला.
या निवडणुकीसाठी १५ जागांसाठी १११ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ३० अर्ज पात्र ठरले. त्यामध्ये उत्पादक सभासदांनी निवडून द्यावयाचे ११ जागांसाठी २१, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी दोन, महिला सभासदांच्या दोन जागांसाठी पाच तर बिगर उत्पादक सभासदांसाठीच्या एका जागेसाठी दोन अशा पंधरा जागांसाठी ३० उमेदवारी अर्ज होते. उत्पादक सभासद गटात तीन व बिगर उत्पादक सभासद गटात एक अशा विरोधी आघाडीच्या चारही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र शाहू साखर कारखाना बहुराज्य कायद्याखाली नोंदणीकृत असल्यामुळे अधिकृत घोषणा शुक्रवारी ता. 24 रोजी होणाऱ्या विशेष सभेत होणार आहे.