लोकप्रतिनधींकडून पाठपुरव्याची गरज पाहणी नंतर शासनाला १० वर्षे पडला विसर
कोल्हापूर(राजेश सातपुते): सांगशीतील अतिप्राचीन शिलालेख दुर्लक्षितच राहिला आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये पुरातत्व विभागाकडून पाहणी झाली. मात्र गेल्या १० वर्षापासून काहीच हालचाल झालेली नाही. पाचव्या शतकात चालुक्य राजा मंगलेश याने पत्नी हलादेवीच्या स्मरणार्थ लिहिलेला शिलालेख हा कोल्हापूर पासून ५० किलोमीटरवर गगनबावडा महामार्गावर सांगशी, ता. गगनबावडा येथील ग्रामदैवत सांगसाई मंदिरामध्ये ग्रेनाईट दगडावर ब्राह्मी लिपी मध्ये कोरलेला शिलालेख आहे.
पाचव्या शतकातील चालुक्य राजा मंगलेश याने आपली पत्नी हलादेवीच्या स्मरणार्थ लिहिलेला हा शिलालेख म्हणजे पत्नीच्या स्मरणार्थ केलेले जगातील पहिले स्मारक आहे.
हे स्मारक १५०० वर्षांपूर्वीचे प्राचीन आहे. याबाबतचे संशोधन प्रथम १९८३ मध्ये डॉ. जे. एफ. फ्लिट यांनी केले. त्यानंतर पी. बी. देसाई, रा. प. पंडित यांनी संशोधन करून त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. Inscription from Kolhapur District-Edits by Dr. S. H. Ritti & Shri. A. B. Karvirkar या कन्नड विद्यापीठ हम्पीने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात याची नोंद आहे.
हा दुर्मिळ व अतिप्राचीन असलेला शिलालेख सध्या दुर्लक्षित आहे. पुरातत्व विभागाकडून हा शिलालेख ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करून यास क वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा. फेब्रुवारी २०१३ मध्ये पाहणी झाली ; पण पुन्हा शासनास विसर पडलेला आहे. शासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
इतिहास संशोधकांत कुतूहल –
इतिहास संशोधकांच्या दृष्टीने गूढ व कुतूहल असलेल्या शिलालेखाचे पहिले वाचन १८९३ मध्ये डॉ जे एम फ्लिट व त्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या डॉ सांकलिया व डॉ एम जी दीक्षित यांनी केले. त्यांच्या मते हे सतीचे स्मारक आहे. बावडेकर घराण्यातील अभ्यासक (कै.) रा. प. पंडित यांनीही या शिलालेखाचा अभ्यास केला पण त्यांच्या मते हे शिल्प सतीचे नव्हे तर पत्नीप्रेमावरील शिल्पाचे एक उदाहरण आहे.
आमच्या घराण्याकडे परंपरेने पूजेचा मान आहे. हा शिलालेख चित्रमय असून, पर्यटक येत असतात ; पण अद्याप सोयी व सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने इतिहासप्रेमींचा हवा तसा प्रतिसाद नाही. शासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. - राजेश पाटील, माजी उपसरपंच