बातमी

गाड्यावरील फळविक्रेता ते सनदी अधिकारी

सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेचे यूपीएससी (UPSC ) परीक्षेत यश

सिद्धनेर्ली (श्रध्दा सुर्वे-पाटील) – ता. कागल जि. कोल्हापुरचे सुपुत्र स्वप्निल तुकाराम माने यांनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा UPSC परीक्षेत देशात ५७८ वा क्रमांक पटकावला आहे.

सोमवारी दुपारीच जाहीर झालेल्या या निकालात अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांने हे यश मिळवले आहे. स्वप्निल याचं प्राथमिक शिक्षण प्राथमिक विद्या मंदिर भागशाळा नदीकिनारा येथे झाले तर माध्यमिक शिक्षण सिद्धनेर्ली विद्यालय सिद्धनेर्ली येथे झाले आहे.इयत्ता १० मध्ये ८४.७३ % गुण मिळवूनही परिस्थितीमुळे त्यांला आयसीआरई (ICRE ) गारगोटी येथे यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल डिप्लोमा ) साठी प्रवेश घ्यावा लागला.

लहानपणीच आईच निधन झाल्याने परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. डिप्लोमा मध्ये ८७.९४ गुण मिळवूनही पुढील शिक्षण घेण्याच्या अशा धूसर झालेल्या असताना त्याला काही लोकांनी शिक्षणासाठी मदत केल्याने विश्वकर्मा इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी (VIT), पुणे या नामांकित शिक्षण संस्थेत बी.ई मेकॅनिकल साठी प्रवेश मिळाला. त्यामध्ये १० पैकी ९.३ क्रेडीट मिळवून २०१८ मध्ये तेथेही अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांची तयारी पुणे येथे सुरु केली.

पहिल्या दोन प्रयत्नात पूर्व परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा तयारी चालू ठेवली .दरम्यान वडिलांचं गावी अपघाती निधन झाल्याने त्याला काही काळ गावी परतावं लागले.कोरोना काळात गावी राहून पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करून दोन्ही परीक्षेत पात्र होवून मे २०२१ मध्ये मुलाखत दिली.

इयत्ता ४ थी मध्ये आईचा व २०१८ मध्ये वडील या दोघांच्या मृत्यूने खचून न जाता घरामध्ये दोन लहान बहिणी, आज्जी आजोबा, पणजी यांचा सांभाळ करत अभ्यासाचा डौलारा सांभाळत परिस्थितीचा बाऊ न करता त्याने हे यश मिळवले आहे. त्यामुळे सिद्धनेर्ली परीसरात त्याचे मोठे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *