बातमी

कागलच्या विकास आराखड्यासाठी साखर पेढे वाटणे म्हणजे अज्ञान आणि असमंजसपणाचा कळस – आम. हसन मुश्रीफ

कोणतेही काम आणि प्रयत्न न करता श्रेयासाठी स्टंटबाजी सुरू

कागल, दि. २७ : कागलच्या विकास आराखड्यासाठी साखर पेढे वाटणे म्हणजे विरोधकांच्या अज्ञान आणि असमंजसपणाचा कळसच आहे, अशी टीका आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केली. कोणतेही काम आणि प्रयत्न न करता श्रेयासाठी विरोधकांकडून निवळ स्टंटबाजी सुरू असल्याचेही ते म्हणाले.

कागल शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला. त्यासाठीच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याबद्दल आमदार आमदार श्री. मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार वड्डवाडीतील झोपडपट्टीधारकांच्यावतीने सत्कार झाला.

भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, झोपडपट्टी धारकांच्या अतिक्रमित जागेवरील आरक्षण उठविण्याचे ठरावही आम्हीच मंजूर केलेले आहेत. प्रयत्न आणि पाठपुरावाही आम्हीच केलेला आहे. लवकरच हे आरक्षण उठेल आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवून देऊन झोपडपट्टीधारकांसोबत दिवाळी साजरी करू.

केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, वड्डवाडी आणि गोसावी वस्ती परिसरातील पोलीस ग्राउंडवरील पिवळा पट्टा उठल्यानंतर झोपडपट्टीधारकांच्या हक्काचे घर तयार होईल. त्यामुळे श्रेयवाद करणाऱ्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका.

माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, कागलचा विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर समरजीत घाटगेनी कशासाठी साखर वाटली? हे अजूनही लोकांना कळेना झाले आहे. या विकास आराखड्याचे काम ज्या एजन्सीकडे आहे, त्या एजन्सी चे नाव त्यांनी सांगावे. अथवा विकास आराखड्याची व्याख्या त्यांनी सांगावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

प्रास्ताविकपर भाषणात नगरसेवक सतीश घाडगे म्हणाले, कागल शहराच्या विकास आराखड्यासाठी
आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय ते मुख्यमंत्री अशा टप्प्यांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्याचेच हे यश आहे. परंतु; बालिश बुद्धीचे काही लोक हे सगळं आपणच केल्याचा कांगावा करून साखर पेढे वाटत आहे.

“मान ना मान, मै तेरा मेहमान……!”
श्री. मुश्रीफ म्हणाले, गेली अनेक वर्ष या विकास आराखड्यासाठी आम्ही प्रयत्न आणि पाठपुरावा करीत आहोत. अजून सूचना व हरकती, त्यानंतर हा प्रस्ताव टाऊन प्लॅनिंगला जाईल व नगर विकास खात्याकडे जाऊन त्यावर शिक्कामोर्तब होईल. परंतु; या सगळ्याशी काहीही संबंध आणि माहिती नसलेले विरोधक “मान ना मान, मै तेरा मेहमान……” या म्हणीप्रमाणे आधीच साखर वाटत सुटले आहेत.

कागल शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय चितारी म्हणाले, एका बाजूला गोरगरिबांसाठी तळमळीने झटणारे मुश्रीफसाहेब आणि दुसऱ्या बाजूला कोणतेही काम न करता निव्वळ स्टंटबाजी करणारे समरजीत घाटगे यांचे बालिश नेतृत्व हा दोन नेतृत्वातील फरक महत्त्वाचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी केडीसीसी बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, विवेक लोटे, नवल बोते, शशिकांत नाईक, संजय ठाणेकर, सुनील माळी, सुनील माने, शहराध्यक्ष संजय चितारी, अस्लम मुजावर, नवाज मुश्रीफ, युवराज लोहार, भगवान कांबळे, प्रकाश मकवाने, भरत सोनटक्के, विजय गोसावी, तानाजी मकवाने, गुलाब मकवाने आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत तानाजी मकवाने यांनी केले. प्रास्ताविक नगरसेवक सतीश घाडगे यांनी केले. आभार शशिकांत नाईक यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *