कागल( विक्रांत कोरे) : ईएसआयएस सेवा दवाखान्यामुळे कामगारांची सोय झाली. या दवाखान्याचा कामगारांना नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन खासदार संजय मंडलीक यांनी केले. ते मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल- हातकणंगले यांनी असोसिएशनच्या जागेमधील महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी संचलित सेवा दवाखान्याच्या व ऋषिका बंसल भवन या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही कोल्हापूर शहरापासून २० किलोमिटर दूर आहे. अशा परिस्थितीत या औद्योगिक वसाहतीत असलेल्या औद्योगिक कामगारांना वैद्यकिय सेवा तात्काळ मिळत नाही, त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत कामगारांना उपचार मिळण्यासाठी मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) यांनी पुढाकार घेवून असोसिएशनच्या ऋषिका बंसल भवन या इमारतीत महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी संचलित सेवा दवाखाना सुरू केला आहे.
मंडलिक पुढे म्हणाले,या औद्योगिक वसाहतीत मोठया प्रमाणावर औद्योगिक उत्पादने तयार होतात. त्यासाठी लागणारे मनुष्यबळही मोठया प्रमाणावर येथे उपलब्ध आहे. त्यांना वैद्यकिय सुविधा मिळणे महत्वाचे होते. या सेवा दवाखान्यास भविष्यात सुविधा वाढविण्यासाठी शासन दरबारी नक्कीच प्रयत्न करु व औद्योगिक वसाहती मधील कामगार व उद्योजक बंधूंना सहकार्य करू असे आश्वासन खासदार मंडलिक यांनी दिले. सदर कार्यक्रमास आलोकजी बसंल मॅनेजिंग डायरेक्टर, आर्या स्टील रोलिंग इंडिया प्रा.लि., मिलिंद चौधरी, संतोष माळवी, सचिन शिरगावकर, संजय शेटे, अध्यक्ष, विज्ञानंद मुंढे, दीपक पाटील, राजू पाटील,पल्लवी कोरगावकर, सचिन मेनन, मॅकचे अध्यक्ष संजय पेंडसे, उपाध्यक्ष यशवंत पाटील, ऑन. सेक्रेटरी सचिन कुलकर्णी, ऑन. ट्रेझरर प्रताप परुळकर, संचालक मनोहर शर्मा, आदी मान्यवर उद्योजक उपस्थित होते.