महाआवासमुळे गोरगरिबांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण
बातमी

महाआवासमुळे गोरगरिबांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण…….! – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागलमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती व घरकुल धारकांना पुरस्कारांचे वितरण…

कागल : महाआवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या स्वतःच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या अभियानांतर्गत गेल्या १०० दिवसात विविध योजनांमधील तब्बल पाच लाख घरकुले पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. कागल पंचायत समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तालुकास्तरीय पुरस्कार वितरणाच्या या कार्यक्रमात ग्रामपंचायती व घरकुल धारकांना पारितोषिकांचे वितरण झाले.  मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, राज्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, शबरी आवास योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून सुरु असलेल्या घरकुलांची कामे रखडलेली होती. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा करून महाआवास अभियान सुरू केले आणि अवघ्या शंभर दिवसातच चांगली फलनिष्पत्ती झाली.

ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील म्हणाले, विविध योजनांच्या माध्यमातून मंजूर होणाऱ्या घरकुल अनुदानाची रक्कम सव्वा लाखांऐवजी अडीच लाख होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद सदस्य अमरीश घाटगे म्हणाले, मागील पाच वर्षात पंचायत राज्यव्यवस्थेला अक्षरश: मरगळ आली होती. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी पंचायतराज व्यवस्थेला खऱ्या अर्थाने उर्जितावस्था आणली. पंचायत समिती सभापती रमेश तोडकर म्हणाले, निधीसह अन्य तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या लाखो घरकुलांचे काम महाआवास योजनेअंतर्गत पूर्ण झाले आहे. अर्जुनीचे सरपंच सुनील देसाई म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या महाआवास अभियानाच्या या धाडसी निर्णयामुळेच गोरगरिबांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळाला व त्यांच्या घरकुलांचे रखडलेले स्वप्न पूर्ण झाले.  स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी महाआवास योजनेच्या माध्यमातून झालेल्या कागल तालुक्यातील उठावदार कामाचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमात अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायती व घरकुल धारकांना पारितोषिकांचे वितरण झाले. योजनानिहाय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती व घरकुल धारकांची नावे अनुक्रमे अशी,………

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामपंचायत अर्जुनी, ग्रामपंचायत दौलतवाडी, ग्रामपंचायत कासारी. रमाई आवास योजना- ग्रामपंचायत मेतके, ग्रामपंचायत वडगाव, ग्रामपंचायत उंदरवाडी. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट घरकुल-  राजेंद्र पांडुरंग पाटील -उंदरवाडी,  मल्लापा रामा चिखले -सुळकूड, हिंदुराव विष्णू चौगुले -बिद्री. रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट घरकुल – बाळू बापू हेगडे- मौजे सांगाव, लाला गंगाराम लोकरे -नानीबाई चिखली, सदाशिव साताप्पा कांबळे -बाचणी. तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार सिद्धनेर्ली जिल्हापरिषद मतदारसंघाला व रमाई आवास योजने अंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदार संघाला मिळाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवी शिवदास, उपसभापती सौ. मनीषा सावंत, विश्वासराव कुराडे, विजय भोसले, दीपक सोनार, जयदीप पवार, सौ. राजश्री माने, अंजना सुतार, आर. एस. पाटील, शशिकांत खोत आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *