बातमी

देशी गाय, बैल, अश्व, श्वान, शेळी, बोकडांचे जंगी प्रदर्शन अन् स्पर्धाही कणेरी मठावर

तब्बल ६९ लाखाची बक्षीसे, गाढवांचे देशातील पहिलेच प्रदर्शन

कोल्हापूर : देशी प्रजातींच्या गाय ,म्हैशी, बकरी, अश्व, गाढव , कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन कणेरी मठावर भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्याप्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मिळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

प्रदर्शनाबरोबर प्रत्येक जनावरांच्या विविध गटात भव्य स्पर्धा होणार असून त्यासाठी ६९ लाखांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना २१ हजारापासून ते लाखापर्यंतची बक्षीसे देण्यात येणार आहेत.

पर्यावरण रक्षणाबरोबरच देशी प्रजातींच्या जनावरांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतुने सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाच्या वतीने २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. देशभरातून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी केली आहे. मठावर गोशाळा असून येथे हजारावर गायी आहेत.

नुकतेच येथे भटक्या कुत्र्यांची शाळा सुरू करण्यात आली आहे. सुंमगलम् पंचभूत महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येणार आहेत. त्यामुळे देशी प्रजातींच्या जनावरांचे भव्य प्रदर्शन हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

तीन दिवस होणाऱ्या या प्रदर्शनात गाय ,म्हैशी, बकऱी, घोडे, गाढव , कुत्रे व मांजर यांचा सहभाग राहणार आहे. यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गाय आणि बैलाला एक लाखाचे तर म्हैस व रेड्याला ५१ हजाराचे बक्षिस दिले जाणार आहे. मांजर, श्वान, शेळी, बोकड यांच्याही स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

देशभरातील विविध जातींचे अश्व येथे पहायला मिळणार आहेत. देशी अश्व स्पर्धेत प्रथम क्रमांकास लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक जनावरांमध्ये नर व मादी अशा दोन गटात बक्षीसे दिली जाणार आहेत.

गाढवांचे प्रदर्शन
अलीकडे अतिशय दुर्मिळ होत असलेल्या गाढवांचेही येथे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. देशातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. त्यांच्याही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. देशी प्रजाती दुर्मिळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *