कागल /प्रतिनिधी : कागल तालुक्यातील वंदूर येथे नदी पाणी पात्रात मगर सापडली. सापडल्यानंतर कागल पोलीस व सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स यांच्या साक्षीने तिला अधिवासात सोडून देण्यात आले मात्र नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून अजूनही भीतीचे सावट कायम आहेत.
दुधगंगा नदी पाण्याच्या पात्रात मासे पकडण्यासाठी अज्ञाताने जाळे लावले होते. त्या जाळ्यात ती सापडली व धडपडू लागली. वंदूर गावातील तरुण बळीराम इंगळे, विशाल पाटील, कृष्णात बागणे, अतुल घाटगे, सुरज इंगळे, सोन्या पाटील यांनी त्या मगरीस बाहेर काढले. ही बातमी गावात पसरली. तिला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली.
कागल पोलीस ठाण्याच्या ए एस आय मोनिका खडके, रणजीत कांबळे ,आर पी सावंत, बी बी रांनगे, प्रदीप पाटील ,कृष्णा पाटील यांनी तसेच सह्याद्री डिझास्टर चे अनिल ढोले, विनय कोरे ,रोहित जाधव, हर्षद पाटील ,सुमित चौगुले ,सम्मेद चौगुले या जवानांनी तात्काळ वंदूरच्या नदीकाठी धाव घेतली. लागलीच कापशी वनपरिक्षेत्र वनपाल बळवंत शिंदे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला त्यांच्या सांगण्यावरून तिला कागल पोलिसांच्या व रेस्क्यू फोर्स जवानांच्या च्या साक्षीने पुन्हा अधिवासात सोडून देण्यात आले.
सदरची मादी मगर ही इंडियन कोकडेल जातीची आहे. तिची वयोमर्यादा 32 ते 35 वयापर्यंत असू शकते .एकाच ठिकाणी तिचे वास्तव्य चार ते पाच दिवस असू शकते ,अशी माहिती इचलकरंजीचे प्राणी मित्र दिग्विजय कस्तुरे यांनी दिली.