बातमी

गुलाब गल्लीतील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर पुरवठा कार्यालयाची कारवाई

अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गुलाब गल्ली येथील कपिल मिठारी यांच्या घरातील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून 15 घरगुती वापराचे एलपीजी (LPG) सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी कोल्हापूर शहरातील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पुरवठा निरिक्षकांची पथक नेमली. या पथकाने ग्राहक कल्याण दक्षता फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींसमवेत 15 मे 2024 रोजी दुपारी 4 च्या सुमारास शहरातील बी वॉर्डातील गुलाब गल्लीत कपिल मिठारी यांच्या घरी अचानक धाड टाकून तपासणी केली असता श्री. मिठारी यांच्या घराच्या आवारात दोन एलपीजी सिलेंडर, गॅस रिफ़िलींग नोझल, वजन काटा इत्यादी संशयास्पद साहित्य आढळले.

पथकाने घराचा दरवाजा ठोठावला असता घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नितीन धापसे- पाटील यांनी जुना राजवाडा पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना दूरध्वनीद्वारे पोलीस पुरवण्याची विनंती केली. त्यानुसार घटनास्थळी पोलीस शिपाई कांबळे हजर झाले व त्यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला असता कपिल मिठारी हे घटनास्थळी हजर झाले. पथकाने घराच्या आवारातील कुलूपबंद दरवाजा उघडण्याची सूचना केल्यावर कपिल मिठारी यांनी सुरुवातीस टाळाटाळ केली परंतू, अधिकाऱ्यांनी खडसावल्यावर दरवाजा उघडला.

या खोलीत सुमारे 15 घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर आढळली. मिठारी यांना पथकाने परवाना दाखविण्यास सांगितले असता मिठारी यांनी परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने सर्व साहित्य (किंमत अंदाजे 60,000 रु.) जप्त केले व जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये संबंधितावर IPC 1860, कलम 285, 286 तसेच अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3.7 अन्वये गुन्हा दाखल केला,

 पथकामध्ये पथकप्रमुख कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन- धापसे पाटील यांच्यासह पुरवठा निरीक्षक भाऊसाहेब खोत, पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम व पोलीस शिपाई राहुल कांबळे यांचा समावेश होता. या कारवाईत ग्राहक कल्याण दक्षता फांउडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी मेघा शर्मा व ओमकार शिंगटे यांचे सहकार्य लाभले. या कारवाईबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी समाधान व्यक्त करुन यापुढेही शहरात अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *