कोल्हापूर : सन 2024-25 वर्षाकरीता यापूर्वी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. सद्यस्थितीत सामाजिक वंचित घटक (SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC, SBC), आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटीत तसेच विधवा महिलांचे पाल्य, अनाथ, दिव्यांग, एच.आय.व्ही. किंवा कोव्हीड प्रभावित बालके इ. घटकांतील मुलांच्या पूर्व प्राथमिक किंवा इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी दि. 17 ते 31 मे 2024 पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले आहे.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांना काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्रांची माहिती देण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करावे. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25 टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे अशा बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
आरटीई अंतर्गत 25 टक्के आरक्षण मधून प्रवेश घेणा-या मुलांच्या पालकांना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे –
जन्माचे प्रमाणपत्र (सर्व घटकांना अनिवार्य)- ग्रामपंचायत/न.पा./ म.न.पा. यांचा दाखला/ रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला/ आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राहय धरण्यात येईल.
निवासी पुरावा ( सर्व घटकांना अनिवार्य ) – रेशनिंग कार्ड / आधार कार्ड / ड्रायव्हींग लायसन्स / प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र / वीज बिल / पाणी बिल / टेलिफोन बिल इ. यापैकी कोणतेही एकही कागदपत्रे नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा किमान 11 महिन्यांचा नोंदणीकृत भाडे करारनामा ग्राहय धरण्यात येईल, भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असणे गरजेचे आहे.
आधार कार्ड ( सर्व घटकांना अनिवार्य )- विद्यार्थी / पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य आहे. परंतु काही कारणांमुळे बालक / पालक आधार कार्ड सादर करु शकले नाहीत तर 90 दिवसांच्या आत बालकाचे आधार कार्ड शाळेकडे सादर करण्याच्या अटीच्या अधिन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. मात्र विहीत कालावधीत याबाबतची पूर्तता न झाल्यास संबंधित बालकाचा आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल.
सामाजिक वंचित घटक यांच्यासाठी वडीलांचा / बालकाचा जातीचा दाखला / प्रमाणपत्र- उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसिलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसुल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा (वडीलांचा / बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (1 लाख रु.पेक्षा कमी उत्पन्नाचा)- तहसिलदार यांच्याकडील प्रमाणपत्र / सॅलरी स्लिप / कंपनीचा किंवा मालकाचा दाखला (सन 2022-23 अथवा सन 2023-24 या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला) ग्राहय धरण्यात येईल. परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही.
घटस्फोटीत अथवा न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- 1) न्यायालयाचा निर्णय अथवा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, 2) बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, 3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे अनिवार्य राहतील.
विधवा महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- 1) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, 2) बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, 3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे अनिवार्य राहतील.
अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- अनाथ बालकांच्या बाबत अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.
कोव्हिड प्रभावित बालके (ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक यांचे निधन दि. 01 एप्रिल 2020 ते दि. 31 मार्च 2022 या कालावधीत कोव्हिड प्रादुर्भावामुळे झाले) यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे -1) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यु प्रमाणपत्र. 2) कोव्हीड 19 मुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, हे वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय / पालिका / म.न.पा.. रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय / प्रयोगशाळा यांचा अहवाल.
एच.आय.व्ही. बाधित / प्रभावित बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र – जिल्हा शल्यचिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
जिल्ह्यातील इच्छुक पालकांनी आरटीई पोर्टलवर नमूद कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन श्रीमती शेंडकर यांनी केले आहे.