बातमी

…अन् निढोरीच्या चिन्याचा चेहरा आनंदाने खुलला

मुरगूड (शशी दरेकर) : माणसाच्या आयुष्यात जन्म झालेला दिवस हा मनाला सुखावणारा असतो.लहान मुलांना तर याचं विशेष कुतुहल असते. आज माझा बर्थडे आहे ही भावना मनाला आनंद देत असते. हे सगळं जरी खरं असलं तरी अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबात जन्म झालेल्या बालकांच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस सारखाच असतो. अशा कुटुंबांत जन्म झालेल्या बालकांना इतरांसारखा माझा वाढदिवस होत नाही ही भावनाच त्यांना निराश करत असते. अशाच एका कुटुंबात जन्मलेल्या चिन्याचा वाढदिवस करण्यासाठी सरसावले माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील.

निढोरी ता.कागल येथील प्रतिक निवृत्ती कांबळे हा सहाव्या इयत्तेत शिकतो.प्रतिकला सगळे चिन्या याच नावाने ओळखतात.लहान वयातच पितृछत्र हरपल्यामुळे चिन्याचा सांभाळ मोलमजुरी करून आईच करते.घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे चिन्याच्या आजतागायत बर्थडे कधीच झाला नव्हता.चिन्या मात्र गावात कोणाचाही वाढदिवस असो,वाढदिवसाच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत हजर असतो.वाढदिवसाचं सगळं नियोजन चिन्याकडेच दिलं जातं.सगळ्यांच्या वाढदिवसात पुढाकार घेणार्‍या चिन्याने 13 व्या वाढदिवसानिमित्त आयुष्यात पहिल्यांदाच केक कापला अन् चिन्याचा चेहरा आनंदाने खुलला.

यावेळी शेकडो मित्रपरिवाराला चिन्याने आमंत्रित केले होते. देवानंद पाटील यांनी चिकण बिर्याणीची सोय केली होती व चिन्यासाठी नविन कपडे खरेदी केली तर सुखदेव सागर यांनी चिन्यासाठी शालोपयोगी वस्तू भेट दिल्या.उपस्थितांनी “शिकून खुप मोठा हो व बाबासाहेबां सारखा स्वतःच्या पायावर उभा रहा”अशा शब्दात चिन्याला शुभेच्छा तर दिल्याच शिवाय भेटवस्तूही दिल्या. या सगळ्या प्रसंगामुळे चिन्याच्या आईला खुपच आनंद झाला व तिने आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.

यावेळी बोलताना देवानंद पाटील म्हणाले, एका उपेक्षित कुटुंबातील मुलग्याचा वाढदिवस साजरा करताना मला मनस्वी आनंद होत आहे.चिन्याने वडील नसल्याचे दुःख बाजूला ठेवून ज्ञानार्जनाकडे लक्ष केंद्रीत करावे.त्याच्या पालकत्वाची जबाबदारी घेण्याची माझी पुर्ण तयारी आहे पण त्याने प्रथम प्राधान्य शिक्षणाला द्यावे. यावेळी राम पोवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी उपसरपंच रंगराव रंडे, ग्रा. पं,सदस्या उषा कांबळे, हिंदुराव चौगले,भैरवनाथ मगदूम, बी.एल.कांबळे, विकास सावंत, प्रकाश कांबळे, गणपती मगदूम, साताप्पा कांबळे, राम पोवार, सुखदेव सागर, भैरवनाथ कांबळे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *