मुरगूड ( शशी दरेकर ) – ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या लहानात लहान ठेवीदारांचा सर्वांगीण विकास हेच राजे बँकेचे ध्येय असल्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. डॉ. भागवत कराड यांनी केले.
शाहू समूहाचा महत्वपूर्ण भाग असणार्या, 106 वर्षे पूर्ण असलेल्या ‘राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक लि. कागल’ च्या मुरगूड येथील नव्या शाखेचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाले. तर कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार संजयदादा मंडलिक व खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे होते.

रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून राजे बँकेच्या आणखीन नवीन पाच शाखांना मंजुरी मिळवून दिल्याबद्दल नामदार डॉ. भागवत कराड यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमास श्रीमंत राजे वीरेंद्र घाटगे, बँकेचे बिद्री चे संचालक बाबासाहेब पाटील, अध्यक्ष एम. पी. पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा लहानात लहान ठेवीदार असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागामध्ये आज राजे बँक अग्रक्रमाने काम करत आहे. छोटा कर्जदार हा कधीही कर्जाचे हप्ते थकवत नाही, बुडवत नाही आणि वेळेवर हप्ते भरत असल्याने बँकाही गतिमान होतात. त्यामुळे येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्रात अनेक शाखा सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचे समरजीतसिंह घाटगे यांनी यावेळी सांगितले.

राजे बॅंकेच्या कार्यतत्परतेबद्दल आणि लोकप्रियतेबद्दल केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी काढलेले उद्गार बॅंकेच्या कार्यशीलतेची पोचपावती आहे. राजे बँक आणि त्यासोबतच शाहू समूहाचा विस्तार होत आहे. लोकांना शक्य तितके सर्व सहकार्य करण्याचा, समाजाच्या विकासाचा स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांचा विचार रुजत आहे, विस्तारत आहे, हे पाहताना फार समाधान वाटत असल्याचेही समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी राजे बँकेचे संचालक मंडळ, विविध पदाधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच शाहू ग्रुपचे अनेक सदस्य, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.