जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day) हा दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. अल्झायमर हा एक मेंदूचा विकार आहे ज्यामुळे स्मृतीभ्रंश होतो. सोप्या शब्दात सांगायच तर विसरभोळेपणा जो कालांतराने वाढत जातो.
यंदाची थीम “Never too early never to late” म्हणजे जोखीम घटक ओळखणे आणि जोखीम कमी करण्याचा सक्रिय उपायांचा अवलंब करणे जेणे करून अल्झायमर सुरु होण्यास विलंब आणि संभाव्य प्रतिबंध करु शकतो. चेतावनी चिन्हावर प्रकाश टाकणे, लोकांना त्याबद्दल ची माहिती, सल्ला आणि उपचार घेण्यास प्रोत्साहीत करणे, जागरुकता वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
अल्झायमर हा डिमेंशियाचा एक प्रकार आहे व त्याचे निदान प्राप्त करणे ही बऱ्याचदा आव्हानात्मक आणि कठिण प्रक्रिया आहे. बरेच लोक या आजाराला सामाजिक कलंक समजतात त्यामुळे या आजाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुध्दा उपचारासाठी येत नाहीत, हे आपल्याला आता बदलण्याची गरज आहे. अल्झायमर हा पूर्ववत न करता येणारा स्मरणशक्तीशी संबंधित आजार आहे. ज्यामुळे स्मरणशक्ती, विचारशक्ती, वागणूक व भाषेमध्ये समस्या निर्माण होतात. आणि दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होतात.
कारणे– अल्झायमर आजारामध्ये मेंदूचा आकार लहान होत जातो व मेंदुच्या पेशी मरतात तसेच पेशीमधील न्युरोट्रान्समीटर (Acetylcholine) कमी होतात. हा वृध्दांना होणारा आजार आहे. ६० वर्षांपेक्षा मोठया व्यक्तींना अल्झायमर्स होतो. पण त्याची सुरुवात वयाच्या ४० ते ५० व्या वर्षांपासून होते.पुरुषांपेक्षा स्त्रियांना हा आजार अधिक दिसून येतो. अनुवंशिक व कौटुंबिक इतिहास असेल तर आजार होण्याची दाट शक्यता असते. डोक्याला दुखापत किंवा डाऊन सिंड्रोम, इतर जोखीम घटक उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, मेंदुचे विकार, धुम्रपान, अति दारूचे व्यसन इत्यादी
लक्षणे – स्मरणशक्ती कमी होणे हे प्रमुख लक्षण आहे. अल्झायमर आजाराची लक्षणे हळूहळू वाढत जातात. सौम्य लक्षणांनी सुरुवात होते व ती अधिक तीव्र होत जातात.
सौम्य (प्रारंभिक लक्षणे) अगदी अलीकडील संभाषणे किंवा घटना विसरणे. उदा. सकाळी काय खाल्ले हे दुपारी आठवत नाही. नवीन माहिती लक्षात ठेवण्यास समस्या, एकाच विषयावर अनेकदा बोलतात. ( तेच तेच बोलणे • घरातल्या घरात वस्तु हरवणे. नियोजन किंवा आयोजन करण्यात वाढलेली अडचण)
ओळखीच्या परिसरात दिशा भरकटणे, हरवून जाणे.. एकाच वेळी एकापेक्षा जास्त कार्य करणे कठीण जाते. वेळेवर बिले भरणे, हिशोब करण्यास त्रास होणे, पैशांचा व्यवहार करणे व मोजणे. रात्री व अपरात्री भरकटणे. विचार व्यक्त करण्यात किंवा संभाषणामध्ये भाग घेण्यास अडचण होते.
मध्यम अवस्था – गोंधळ व दिशाहिनता वाढणे. वस्तुसाठी योग्य शब्द आठवत नाही किंवा चेहरा बघून आपण त्या व्यक्तीला ओळखतो पण नाव आठवत नाही. कोणता दिवस, महिना, वर्ष आठवत नाही. झोप, भुक विस्कळीत होते भटकणे व हरवण्याचा धोका वाढतो कारण घरचा पत्ता न आठवणे.
क्रमाने गोष्टी करण्यात अडचण निर्माण होते. उदा. भाजी करायची असले तर ती कोणत्याप्रमाणे करायची, फोडणी आधी की भाजी आधी पालायची हे आठवत नाही.• दैनंदिन परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता कमी होते.आंघोळ करणे, कपडे घालणे यासारखे मुलभूत कामे कशी करावी हे विसरतात. • वर्तन व व्यक्तीत्वात बदल चिडचिड, अस्वस्थता, राग, संशयास्पदता, भ्रम, भास नैराश्य, कामात रस नसणे, लहरीपणा, प्रतिबंध कमी होणे (Loss of Inhibitions) व आत्महत्या दैनंदिन काळजी घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहणे वाढते.
गंभीर /तीव्र अवस्था -• वटी शेवटी कुटुंबाना घरच्या लोकांना न ओळखणे रोजची कामे जसे की आंघोळ करणे कपडे घालणे, जेवण करणे, शौचास जाणे, या सारखी कामे कोणाच्याही मदतीशिवाय करता येत नाही. इतरांवर पूर्णपणे निर्भर होतात.
निदान- राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत मानसोपचार विभाग हा सेवा रुग्णालय, कसवा बावडा, कोल्हापूर येथे कार्यरत आहे. या विभागात मेमरी क्लिनिक द्वारे ६० वर्षावरील ज्येष्ठ रुग्णांचे स्मरणशक्ती तपासणी, निदान व उपचार केले जातात. तसेच सामान्य/ग्रामीण / प्रा. आ. केंद्र या सर्व ठिकाणी देखील ६० वर्षावरील सर्व रुग्णांची स्मरणशक्ती तपासणी केली जाते. संज्ञानात्मक कार्य, स्मृती, आणि सामान्य कौशल्यांचे मुल्यमापन करण्यासाठी मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशन (MMSE) या सारख्या न्युरोसायकॉलॉजिकल चाचण्यांचा समावेश केला जातो. सिटी स्कॅन, एमआरआय या सर्वांत जास्त चाचण्यांचा वापर केला जातो. अल्झायमर आजाराव्यतिरिक्त इतर कारणांची शंका येत असल्यास रक्त चाचणी करतात.
उपचार – अल्झायमरचा पूर्ण उपचार उपलब्ध नाही. पण विस्मरणाची गती कमी व्हावी, मंद व्हावी, वर्तन दोष कमी यावेत यासाठी औषधे उपलब्ध आहेत. त्यासाठी मानसोपचार डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे महत्वाचे आहे. उपचारांमुळे आजार स्थिर ठेवता येतो. सुरुवातीच्या स्टेजमध्ये उपचार सुरु केले की, रुग्णांना पुढचे काही वर्ष सामान्य आयुष्य घालवता येते. याचबरोबर नियमित व्यायाम करणे, सकस आणि ताजे अन्न खाणे, साखर, मीठ व स्निग्ध पदार्थ मर्यादित करणे. फळे व भाज्यांचे सेवन वाढविणे, दैनंदिन डायरीचा वापर करणे त्यामध्ये रोजची कामे त्यामध्ये लिहून ठेवावीत.
नियमित त्यांना मानसिक व शारीरिकरित्या सक्रिय ठेवण्यास मदत करु शकता भाजी निवडणे, कपडयाला घडी घालणे, बागकाम, छंद जोपासणे, पेपर वाचणे, स्त्रोत म्हणणे, देवपूजा करणे, शब्दकोडी, गेम खेळणे इ. जेणेकरुन बौध्दिक क्रिया चालू राहिल व मेंदु सक्रिय राहिल.
अल्झायमर रुग्णांची काळजी कुंटुंबानी कशी घ्यायची. प्रथम संयम ठेवणे. आधार, प्रेमाची व आपुलकीची त्यांना गरज असते – अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणे गरजेचे असते. एक सुरक्षित वातावरण घरी तयार करणे म्हणजे घर चांगले प्रकाशित ठेवणे रात्री झिरो बल्ब रुग्णाच्या खोलीत लावणे, स्पष्ट चिन्ह लावणे (किचन/वायरुम) लावणे ज्यांने त्यांना ते मार्ग सापडतील. रात्री आतून दाराला कुलुप लावणे म्हणजे रुग्ण बाहेर जाऊ शकणार नाही.
प्रतिबंधात्मक उपाय – जीवनशैलीमध्ये काही बदल करून हा आजार दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. हृदय निरोगी ठेवा. • चांगली झोप घ्या. रोज किमान ३० मिनिट व्यायाम, योगा, ध्यान असा एकतरी व्यायाम प्रकार करा. छंद जोपासा. दारू, सिगारेट, तंबाखू, अशी व्यसन टाळा. – कोणत्याही कामात स्वतःला सतत गुंतवा
जर आपल्या घरामध्ये वृध्द व्यक्ती असल्यास आणि त्यांच्यात अल्झायमरची लक्षणे दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. सर्व उपचार जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी उपलब्ध आहेत.
डॉ. अर्पणा कुलकर्णी
मानसोपचार तज्ञ
सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर
टेलिमानस हेल्पलाईन नं. – १४४१६