अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्याला समाजाचे काम करताना दोन पातळ्यांवर लढावे लागते. टोकाचा संघर्ष करावा लागतो. सत्ताधारी आणि सनातनी प्रवृत्ती अशा दोन पातळ्यांवर लढताना त्याला कठीण जाते. आपल्या पाठीशी कोणतीही यंत्रणा नसताना तो लढत असतो. अशा अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजातील कोणीही उभे राहत नाही. इंग्रजांना घालवणे सोपे होते. पण स्वकीयांशी लढताना लढाई अवघड होती. देशात प्रतिगामी शक्तींचा प्रभाव वाढतो. यावेळी अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज असते. सध्याच्या काळात अव्वल दर्जाचे कार्यकर्ते शोधूनही सापडत नाही. प्रतिगामी शक्ती गनिमीकाव्याने काम करीत असते. ती कधी दाभोळकरांचा खून करेल तर कधी कॉ. पानसरे यांचा खून करेल, कधी महात्मा गांधींची बदनामी करेल तर कधी स्वातंत्र्याची कुचेष्टा करेल. लोकांचीही विवेकबुध्दी नष्ट झाली आहे.
आपल्या समाजातील आदर्शाचा अवमान होत असेल तर लोक पेटून उठत नाहीत. यावरून महाराष्ट्र सध्या पुरोगामी राहिलेला नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र दिसत नाही. सनातनी प्रवृत्तींचे डावपेच बहुजनांच्या लक्षात येत नाहीत. या सनातनी प्रवृत्तींनी समाजातील सगळी क्षेत्रे काबीज केलेली दिसतात. दूरदर्शन, मोबाईल व वृत्तपत्रे या घटकांना सनातनी प्रवृत्तीने ताब्यात घेतले आहे. प्रसारमाध्यमांच्या सर्व घटकावर सनातन्यांचा निर्विवाद कब्जा आहे. प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात त्यांची अनेक माणसे काम करतात. प्रसार माध्यमांचा उपयोग करून घेऊन या मंडळींनी आपल्या समूहातील बेरोजगारी कमी केलेली दिसते. दूरदर्शन वरील अनेक कलाकार, तंत्रज्ञ तसेच वृत्तपत्रातील वरिष्ठ जागी असणारे अनेक लोक सनातनी समूहातील असलेले दिसतात. त्यांचे वरिष्ठ पातळीवर काम करणारे लोक आपल्या समूहातील व्यक्तीला संधी देतात.
ते आपआपली माणसे सांभाळतात. प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात एखादा निखिल वागळे सारखा पुरोगामी कार्यकर्ता असेल तर त्याला त्रास देऊन नोकरी सोडण्यास भाग पाडतात. दूरदर्शनवर सध्या जे कार्यक्रम चालतात ते बहुजन समाजाच्या हिताच्या विरोधात असतात. दूरदर्शनवर आसाराम बापू किंवा भोंदू बाबांच्या बातम्या दाखवण्यापेक्षा बाबा आमटे, गाडगेबाबा, अभय बंग, कर्मवीर भाऊराव पाटील दाखवले पाहिजेत. प्रसारमाध्यमे डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना शोधून काढण्याच्या संदर्भात बातम्या देत नाहीत. हे जाणून बुजून केले जाते अशी शंका येते. प्रसारमाध्यमे कुणाच्यातरी दबावाखाली काम करीत असावेत असे वाटते.
पुणे गावांमध्ये डॉ. दाभोळकरांचा व कोल्हापूरमध्ये कॉ. पानसरे यांचा खून
महात्मा फुले यांच्या पुणे गावांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा खून व्हावा व राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये कॉ. गोविंदराव पानसरे यांचा खून व्हावा हे सर्वांना लांच्छनास्पद आहे. राज्यकर्ते भेकड आहेत. त्यांच्या नाकर्तेपणाने आम्ही महाराष्ट्रातील दोन समाजसुधारक गमावले आहेत. राज्यकर्त्यांना फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. समाजामध्ये दहशतीचे वातावरण आहे. सनातनी प्रवृत्ती पुरोगाम्यांशी विचाराने लढण्याची क्षमता नसल्याने ते चांगल्या माणसाचा खून करतात.
सध्याच्या काळात आमच्याकडे अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्यांची फौज असायला हवी होती. पण सध्याच्या काळात असे कार्यकर्ते दुर्मिळ आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांमध्ये अव्वल दर्जाचे अनेक कार्यकर्ते आपल्याकडे होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान होते. या कार्यकर्त्यांचे देशावर नितांत प्रेम असल्याने त्यांची त्यागाची भूमिका होती. त्यांना समाजसुधारकांचा आशीर्वादही होता. या दहा वर्षातील कार्यकर्त्यांचे वागणे, बोलणे, साधे राहणे समाजाला आदर्शवत होते. त्या पिढीला भ्रष्टाचार माहित नव्हता.
कार्यकर्त्याला मोठे होण्यासाठी पैशाची गरज लागत नव्हती. त्याला फक्त चारित्र्याची गरज असायची. तो कार्यकर्ता मोठमोठ्या संस्था चालवायचा पण त्याला पैसे खाणे हा प्रकार माहित नव्हता. समाजाला चांगले काहीतरी करून दाखवायचे एवढेच त्याला माहीत असायचे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, शास्त्री, आझाद पटेल, सेनापती बापट यासारख्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर असायचा, ध्येयवादी आणि देशप्रेमी पिढी त्याकाळातील लोकांनी पहिली. राष्ट्रवादाने भारावलेला देश एकेकाळी समाजाने पाहिला. आज सगळे चित्र उलटे झालेले दिसते.
त्यागाची जागा भोगाने घेतली, आदराची जागा भीतीने घेतली. दहशत भीती दाखवून, गावात धाक निर्माण करून आपले नेतृत्व मान्य करायला लावणारे गावठी नेतृत्व तयार झालेली दिसते. राजकीय कार्यकर्त्यांचे भय वाटावे अशी सध्याची परिस्थिती आहे. तो आपले नुकसान करेल, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीत आडवा येईल याची सतत भीती वाटते. त्याचे नेतृत्व नाईलाजाने इतरांना स्वीकारावे लागते. अशा गावगन्ना नेतृत्वाने काहीही काम न करता घाम न गाळता पाच पाच मजली इमारती उभ्या केलेल्या दिसतात. त्याच्याकडे वाहतुकीची साधने म्हणजेच दोन चाकी, चार चाकी असल्याने सामान्य कार्यकर्त्याला गाडीतून फिरवून आपल्या पाठीमागे फिरवितो. गावागावात असे धनदांडगे सरदार वतनदार तयार झाले आहेत.
काल अन्नाला मोताद असलेला कार्यकर्ता आज दररोज आलिशान हॉटेलमध्ये भोजनाचा आस्वाद घेतो. हा कार्यकर्ता गावातील लोकांना पैसे देऊन त्यांची मते विकत घेतो. या मतांच्या जोरावर गावाचा प्रमुख होतो. गावातील सर्व संस्था पैशाचा जोरावर ताब्यात घेतो.
अशा या अनैतिक राजकारणाला वरिष्ठ नेत्याचा आशीर्वाद असतो. कारण तो नेतापण लोकांना पैसे देऊन लाचार करून निवडून आलेला असतो. भ्रष्टाचारातून निर्माण झालेला हा गावातील नेता पैसे देऊन कार्यकर्त्यांना निरनिराळ्या स्पर्धा भरवण्यास सांगतो. गावातील कार्यकर्तेही त्याचे काम इमानेइतबारे करतात. स्पर्धेला बक्षिसे देऊन युवकांना आपल्या छापील नावाचे बनियन वाटप करतो. आपला वाढदिवस मोठ्याने साजरा करतो. भावी नेतृत्व, युवकांचे आशास्थान, विभागाचे भाग्यविधाते, आमचे लाडके नेतृत्व अशी वाक्ये घालून गावाच्या चौकाचौकात आपली छबी असलेले बोर्ड लावतो. हे गावगुंडी नेतृत्व इतके बेरकी असते की इतरांच्या मुलांना ते शिक्षण घेऊ देत नाही. आपल्या पाठीमागे सतत फिरले पाहिजे यासाठी तो त्या कार्यकर्त्याचे शैक्षणिक नुकसान करतो. एकंदरीत तो गावगुंडी नेता सोबतच्या कार्यकर्त्यांचे संपुर्ण जीवन उध्वस्त करतो.
इकडे ध्येयवादाने काम करणारे मुठभर कार्यकर्ते मूल्यांसाठी गावागावात संघर्ष करीत असतात. अगदी कपाळमोक्ष होईपर्यंत लढत असतात. या कार्यकर्त्यांच्यावर पुढार्यांचे चांगलेच लक्ष असते. ते लोकांचे प्रबोधन करीत असतात. लोक शहाणे झालेले पुढार्यांना चालत नाही. शुद्ध भावनेने काम करणारी पिढी कधीच गायब झालेली दिसते. एखादा कार्यकर्ता शुद्ध भावनेने काम करीत असलेला दिसला तर तो तरंगत्या कागदाप्रमाणे लाटेच्या वेगात फिरत असतो. त्याला घेरी येते. समाजाला खरा अव्वल दर्जाचा कार्यकर्ता जर शोधायचा असेल तर तो मोठ्या गर्दीतून शोधावा लागेल. तो कार्यकर्ता धाडसी, अभ्यासू, चारित्र्यसंपन्न व समाजाबद्दल कळवळा असलेला असेल याची आम्हाला खात्री आहे.