20 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचा मृत्यू झाला. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नीवर सकाळी फिरावयास गेल्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी खुनी हल्ला झाला. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. सारे कोल्हापूर शहर आणि महाराष्ट्र हादरला. त्यांच्या स्मारकाचे नुकतेच कोल्हापुरात उद्घाटन झाले. ज्या दिवशी कॉम्रेड पानसरे यांच्यावर हल्ला झाला त्याच दिवशी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन झाले. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2015 या तीन महिन्यात आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. तीन मोठे नेते आपल्याला सोडून कायमचे निघून गेले. 10 मार्च 2015 या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे निधन झाले. 1 एप्रिल 2015 या दिवशी सहकार चळवळीतील अभ्यासू नेते, माजी आमदार सा. रे. पाटील आपल्यातून निघून गेले. 13 एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्रातील सहकारातील अभ्यासू व ज्यांना सहकारातील हिंदकेसरी म्हणून संबोधले जायचे ते माजी आमदार व कागल संस्थांनचे राजे विक्रमसिंहजी घाटगे यांचे अकस्मात निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यावर या चार नेत्यांच्या निधनाने मोठे आघात झाले. या नेत्यांनी तब्बल 45 वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे जाणतेपणाने नेतृत्व केले.
एका काळ असा होता की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराला मानणारी भक्कम फळीच काम करीत होती. त्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. गोविंदराव पानसरे, शेतकरी कामगार पक्षाचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील, लोकनेते सदाशिवराव मंडलिक, कॉम्रेड संतराम पाटील, कॉम्रेड जीवनराव सावंत, माजी आमदार एस.पी. पाटील, माजी आमदार के.एल. मलाबदे या मंडळींचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात मोठा दरारा होता. या नेत्यांनी जातीयवादी पक्षांना जिल्ह्यात अनेक वर्षी फिरकु दिले नाही. कॉ. गोविंदराव पानसरे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे असूनही या सर्व नेत्यांबरोबर त्यांचे चांगले जमत होते. कॉ.पानसरे पुरोगामी विचाराच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन काम करीत. या नेत्यांच्या बरोबर त्यांचे कधीही मतभेद झाले नाहीत. या मंडळींनी कोल्हापुरात जातिवादा विरोधात अनेक लढे लढवले. या काळात कोल्हापूर जिल्ह्यात जातीयवादी पक्षांना अजिबात थारा नव्हता. आज ही बलाढ्य नेतेमंडळी आपल्यात नाहीत. पर्यायाने देशात, राज्यात तसेच कोल्हापूर जिल्ह्यात जातीयवादी पक्षांनी सार्या व्यवस्थेच्या कब्जा घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
छत्रपती शिवरायांचा उपयोग करून समाजामध्ये धर्मवादी शक्ती सध्या थैमान घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी घटना यापूर्वी कॉ. गोविंदराव पानसरे जिवंत असताना घडली होती. त्यावेळी त्यांनी लेखणी उचलली व पुस्तक लिहिले. ‘शिवाजी कोण होता’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाने सार्या महाराष्ट्र हादरला. या पुस्तकाच्या अनेक आवृत्ती निघाल्या. हजारो पुस्तके विक्री झाली. याच पुस्तकामुळे कॉ. पानसरे यांचा खून झाला अशी सध्या चर्चा आहे. समाजात फूट पाडणार्या शक्तीला ही चांगलीच चपराक झोबंली होती. या पुस्तकाचा अप्रचार करण्यास वाव मिळेना म्हणून या पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून गदारोळ माजविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या गदारोळातही कॉ. पानसरे यांनी समर्थपणे उत्तरे दिली. अलीकडच्या बाजारू आणि स्वार्थी राजकारणात मी मी म्हणणार्यानी नवे घरोबे केले. उंबरठे बदलले, कपाळावरील कुंकू बदलले अशा परिस्थितीत कॉ. पानसरे यांनी आपले तत्त्वज्ञान न बदलता खंबीर राहिले. मुठ आवळून लाल बावटा कायम दिमाखाने फडकत राहिला.
त्यांच्या जीवनात अनेक अडथळे आले. एकुलता एक मुलगा अविनाश पानसरे याचा मृत्यू झाला. कौटुंबिक आघात झाले. पण पानसरे खंबीर आणि निश्चल राहिले. त्यांनी कार्ल मार्क्सचा विचार कधी सोडला नाही. ते नेहमी मुठ आवळून क्रांतीच्या घोषणा देत राहिले. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांच्या समोर दीपस्तंभा सारखे राहिले. कॉ. पानसरे यांचे कॉम्रेड, प्रबोधनकारक, वक्ता, कुशल संघटक, विचारवंत, वकील, आदर्श कुटुंब प्रमुख, चांगला वाचक अशी अनेक रूपे त्यांची होती. ते स्वतः नेते होतेच पण त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. ग्रामीण व्यवस्थेमधील अनेक कार्यकर्त्यांना हातात लाल झेंडा देऊन त्यांना कॉम्रेड बनविले. चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांच्या संसाराकडेही त्यांचे लक्ष असे. चळवळ करताना घरचा संसारही चांगला करावा अशी कार्यकर्त्यांच्याकडून त्यांची अपेक्षा असायची. बरोबरीच्या कार्यकर्त्याला प्रेमाचे वागणूक देऊन समाजात स्थान मिळवून दिले. त्यांची भाषणेही ऐकण्यासारखे असायची.
कोणताही किचकट विषय सोपा करून मांडण्याची त्यांची शैली श्रोत्यांना फार आवडे. कामगार चळवळीत काम करीत असताना ते कोर्टात वकीलकीही करीत. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर अभ्यास करून कोर्टात त्याला न्याय मिळवून देण्याचे काम करीत. या दोन्ही गोष्टी त्यांनी साधल्या होत्या. कॉ. पानसरे यांची अनेक भाषणे ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यांचे भाषण समोरच्या श्रोत्या बरोबर संवाद केल्यासारखे होते. यांची लढण्याची दिशा स्पष्ट होती. त्यांचे भाषण आक्रस्ताळी, लागट, कर्कश, टीका न करता आशययुक्त असे. त्यांना सर्व विषयाचा चांगला अभ्यास होता. आचार्य शांताराम गरुड यांनी इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधिनी स्थापन केली. त्याचे ते संस्थापक सदस्य होते. प्रबोधनीच्या वतीने जिल्हाभर प्रबोधन मिळावे, परिसंवाद, व्याख्यानमाला, शिबिरे आयोजित केली जातात. या सर्व उपक्रमात कॉ. पानसरे यांचे मार्गदर्शन असायचे. कॉ. पानसरे यांच्या जाण्याने चळवळीची, प्रबोधनाची मोठी हानी झाली. अशा या लढाऊ नेत्याला लाल सलाम.