बातमी

शासन पुरस्कृत गुंडशाही लोकशाहीला धोकादायक

श्री. सम्राट सणगर

शासन पुरस्कृत गुंडशाही लोकशाहीला धोकादायक

उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते, कल्याण शहर शिवसेनाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशन मध्येच रिवाल्वर मधून गोळ्या झाडल्या. तसेच आमदार गायकवाड यांच्या अंगरक्षकांनी महेश गायकवाड यांच्या सहकारी शिवसैनिक राहुल पाटील यांचेवर चार गोळ्या झाडल्या. हा गोळीबाराचा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये घटल्याने पोलीस खात्याची व गृह खात्याची मोठी बदनामी झाली आहे. दुसरा प्रकार उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा समोरून गोळ्या घालून खून करण्यात आला. तिसरा प्रकार सांगली येथील आरटीआय कार्यकर्ता संतोष कदम यांचा नुकताच खून करण्यात आला.

या सर्व घटना ऐकून सामान्य माणूस घाबरून गेला आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना मान्य करावेच लागेल. राज्याची गृहखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. यांचे खात्यावर नियंत्रण नाही. शिवाय ते खात्याचा कारभार चालवण्यात अपयशी ठरले आहेत. फडणवीस यांच्याच पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. सध्याचे सरकार गुंडांना बळ देणारे असून पोलीस खाते हतबल झाले आहे. स्वामित्व, नेतृत्व व प्रतिनिधित्व यामुळे समाजाची जडणधडण होत असते असे मानले जाते. या तिन्ही तत्त्वाचा मुळ आधार गुंडशाही असेल तर समाजाचा दर्जा खालावलेला असेल. सज्जनांच्या मौनातून आणि निष्क्रियेतून गुंडांचे फावत असते. समाजकंटकांना बळ मिळते. दुर्जनांच्या पाप कृत्यापेक्षा सज्जनांचे मौन कधीही धोकादायक असते.

सध्या सज्जनांची आपल्या स्वार्थासाठी दुर्जनांच्या गुंडशाहीचा आधार घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. म्हणजेच गुंडांच्या गुंडशाहीला खतपाणी घालण्याचे काम सज्जनच करीत आहेत. त्यामुळे गुंडशाहीला बळ आणि धैर्य देण्याचे काम सज्जनच करीत आहेत. सामाजिक परिस्थिती बिघडली की गुंडांना बळ येते. गुंडशाही जेवढी बळकट होते तेवढी लोकशक्ती कमकुवत होती. म्हणून गुंडशाही या विषयावर चिंतन, मनन होणे गरजेचे आहे. बेकारी आणि बेरोजगारी यामुळे गुंडशाहीला जोर मिळतो. तसेच गुंडगिरी वाढीस लागते. श्रमा शिवाय व कमी वेळेत भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सर्वत्र हव्यास दिसतो. आज समाजात वाल्यांचा वाल्मिकी होताना दिसत नाही पण वाल्मिकीचा वाल्या होताना दिसतो. समाजामध्ये गुंडगिरीचा हैदोस चालू असताना समाज शांतपणे बघत बसतो याचे आश्चर्य वाटते. एकंदरीत सज्जनानी, प्रतिष्ठीतांनी, धनिक आणि नेत्यांनी गुंडांना बळ प्राप्त करून दिले आहे. सज्जन निष्क्रिय झाल्यामुळे दुर्जन कार्यरत आहेत. गुंडांची संघटन शक्तीही वाढली आहे.

परवा पुण्यामध्ये पोलीस खात्याने पुणे शहरातील सर्व गुंडांना एकत्र बोलावले होते. आश्चर्य म्हणजे पोलीस खात्याच्या आदेशानुसार 267 गुंड एकत्र जमा झाले होते. पुणे सारख्या शहरांमध्ये इतके गुंड असावेत यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. हे गुंड धाडसाने पोलीस अधिकार्‍यांसमोरच आले. या सर्व गुंडांचे पत्तेही पोलीस खात्याकडे उपलब्ध आहेत. खून, दरोडे, खंडणी, लूट यासारख्या घातक कामात हे सर्व गुंड तरबेज असणार. इतक्या संख्येच्या गुंडांचा सज्जन नागरिकांना किती त्रास होत असेल याचा विचार करा. या गुंडांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, जे प्रश्न वर्षानुवर्ष कायद्याने सुटत नाहीत ते प्रश्न हे गुंड चुटकी सरशी सोडवतात. आपापसात एकी नसेल तर गुंडागिरीला मोल राहणार नाही याची जाणीव गुंडांना असल्याने ते संघटित आहेत. त्यांच्या संघटनेला ‘गँग’ असा शब्द आहे. आज प्रत्येक जण आपापल्याला शहाणा समजत असल्याने सज्जन लोकांची एकी होत नाही. त्यामुळे सज्जनांची शक्ती प्रभावहीन, विघटित व विस्कळीत आहे. आजचे चित्र भयानक आहे. शासन आणि अनुशासन दोन्हीही गोष्टी अस्तित्वात नाहीत. यामुळे स्वैराचार, दुराचार व अत्याचार याचे प्राबल्य वाढलेले दिसते. गुडांना पक्ष नसतो, सिद्धांत नसतो, जात धर्म देखील नसतो. तो केवळ आणि केवळ गुंड असतो. तो न राबता फक्त लाठीच्या उपद्रवशक्तीने सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त करून घेतो. सज्जनांचा कमकुवतपणा, वांज सज्जनता आणि अवास्तव अहंकार ही दुष्टांची शक्ती स्थाने आहेत. संघटित होऊन सज्जन मंडळी गुंडशाहीचे आव्हान स्वीकारत नाहीत. सज्जनांची आत्मसमर्पणाची तयारी नसते. आज लोकशाही यशस्वी होण्यासाठी निर्भय व कर्तव्यदक्ष लोकांची गरज आहे.

आपण सामान्य माणसाला निर्णय करण्यासाठी लोकशाही स्वीकारली. पण तोच सामान्य माणूस गुंडगिरीला शरण जाताना दिसतो. तसेच कायदा, सुव्यवस्था राखणारे घटकही गुंडगिरीला शरण जातात. त्यामुळे सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न आहे. आज सामान्य माणूस अस्वस्थ आहे. राज्यकर्त्यांनी आणि धनदांडग्यानी देशातील सर्व प्रसार माध्यमे विकत घेतली आहेत सर्व चॅनेल, वर्तमानपत्रे ठरवून दिल्यासारखे बातम्या देतात. सामान्य माणसाला खरे काय आहे कळत नाही. राजकारणाची पातळी तर अगदी खालावली आहे. नेत्यांनी भाषा, कृती लोकांनी आदर्श घ्यावा अशी दिसत नाही. काही माणसांनी दूरदर्शन आणि वर्तमानपत्रे वाचण्याचे बंद केले आहे. सारा पोरखेळ चालला आहे. बाजारातील वस्तू मध्यमवर्गीय व राबणार्‍या माणसाच्या खिशाला परवडत नाहीत. बाजारातील ज्वारी, तांदूळ, गहू, तेल साबण, साखर, गॅस या वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. नोकर्‍या उपलब्ध नाहीत यामुळे युवकांची बेरोजगारी वाढली आहे. युवक अस्वस्त आहेत. बेरोजगार युवकांचा राज्यकर्ते गुंडगिरीसाठी वापर करीत आहेत. त्याला पोटभर दारू, मटण देऊन त्याच्या हातामध्ये काठी, तलवार दिली जात आहे. त्यांच्या भवितव्याचा विचार राज्यकर्ते करीत नाहीत. कुजलेले, कस नसलेले निकृष्ट दर्जाचे रेशन देऊन जनतेला फसवले जात आहे. आता सज्जनांनी या सर्व गोष्टींचा विचार करून संघटित होणे गरजेचे आहे. निर्भय होऊन स्पष्ट बोलणेचे धाडस केले पाहिजे. व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे. व्यवस्था बदलण्यासाठी संविधानाशिवाय दुसरा उपाय नाही. मतदार राजा आहे. तो चांगला निर्णय घेईल यावर आमचा विश्वास आहे.

श्री. सम्राट सणगर

One Reply to “शासन पुरस्कृत गुंडशाही लोकशाहीला धोकादायक

  1. This entrance is unbelievable. The splendid substance displays the creator’s dedication. I’m overwhelmed and anticipate more such astonishing posts.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *