संपादकीय

सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्वस्थ करणारे

सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ करणारे आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक या सर्व क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात वातावरण गढूळ झाले आहे. महागाई, शेतकऱ्यांच्या मालाला दर नसणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दंगली, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा यामुळे महाराष्ट्र कधी नव्हता इतका अस्वस्थ आहे. त्यातच सर्व प्रकाराची चॅनेल कळीचे मुद्दे सारखे सारखे दाखवून गोंधळात भर घालत आहेत. वातावरण कलुषित करत आहेत. आपल्या चॅनेलचे महत्व कसे वाढेल असे सर्व चॅनलला वाटते असे दिसते.

सेना व भारतीय जनता पक्षाचे बिनसल्यापासून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चॅनेल ताब्यात घेतल्यासारखे ते वागत आहेत. एकमेकांवर टीका करताना अनेकांची सतत जीभ घसरताना दिसते. या दोन्ही पक्षांनीही जे प्रवक्ते नेमले आहेत त्यामध्ये काही अभ्यास नसलेले वाचाळवीर आहेत. त्यांनी टीका करताना सभ्यताही सोडून दिली आहे.

आपली उंची किती, आपण काय बोलतो याचे भानही ठेवताना ते दिसत नाहीत. समाजात कवडीची किंमत नसलेले लोक राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्यावर टीका करून आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. आपली दूरदर्शनवर छबी यावी यासाठी हे लोक केवीलवाणी धडपड करताना दिसतात. हे लोक आपल्या मतदारसंघात सरळ निवडूनही येऊ शकणार नाहीत. लौकिकाने मोठे असलेल्या नेत्यांवर टीका करताना आपल्यामुळे आपल्याच पक्षाची प्रतिमा मलीन होईल याचे भान त्यांना असत नाही. काही पक्षांनी तर पक्षाच्या स्वार्थासाठी अर्वाच्च बोलणारे दूरदर्शनवर प्रतिक्रिया देण्यासाठी नेमलेले आहेत.

एकंदरीत भारतीय राज्यघटना, कायदा, न्याय व्यवस्था याचा मान राखणारी नेते मंडळी कमी झाले आहेत. घटनेचा अभ्यास नाही, प्रश्नांचा सखोल अभ्यास नाही अशीच माणसे सध्या प्रसार माध्यमात प्रतिक्रिया देताना दिसतात. दूरदर्शनवरील बातम्या पाहताना नागरिक अस्वस्थ होत आहे. महाराष्ट्रात इतक्या खालच्या पातळीवर राजकारण गेलेले लोकांनी कधीही पाहिलेले नाही. राज्यात सुसंस्कृत नेत्यांची संख्या कमी झालेली दिसते.

या राज्याला फार मोठ्या परंपरा आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतराव नाईक, स्व. वसंतदादा पाटील, स्व. शंकरराव चव्हाण, स्व. विलासराव देशमुख, शरद पवार यांनी चांगले आदर्श घालून दिले असताना आज आदर्शांची मोडतोड पावलोपावली होताना दिसते. हा देश गांधी, नेहरूंचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील लाखो लोकांनी बलिदान केले आहे. महाराष्ट्राची चौफेर प्रगती ही या दिग्गज नेत्यांनी केली.

त्यांनी महाराष्ट्राचा लौकिक भारत देशात वाढवला. तो रसाततळाला नेण्याचा काही लोक प्रयत्न करीत आहेत. आजच्या नेत्यांनी गांधीजींच्या सात सामाजिक पापांचे वाचन केलेले दिसत नाही. त्यांनी अभ्यास केला असता तर राजकारणाची पातळी इतकी खाली आली नसती.

gandhiji
mahatma gandhi

१) परिश्रमविहीन संपत्ती २) सदाचारविहीन व्यापार ३) चारित्र्यविहीन ज्ञान ४) विवेकविहीन सुख ५) संवेदनाविहीन विज्ञान ६) वैराग्यविहीन उपासना ७) सिद्धांतविहीन राजकारण अशी ती सात सामाजिक पापे आहेत. या सात पापांचा राज्यकर्त्यांना विसर पडलेला आहे. विनोबाजीनी ‘थिंक ग्लोबॅलिटी अॅक्ट लॉकॅलिटी’ असा संदेश दिला. चिंतन जागतिक असावे पण सुरुवात आपल्यापासून करावी असे सांगितले. लोकप्रतिनिधीनी आपले प्रश्न आपण समजावून घेतले पाहिजेत.

राजकारणाची पातळी खालवण्याचे कारण म्हणजे आपण योग्य व चांगले प्रतिनिधी पाठवण्यास कमी पडलो. पाच वर्षातून एकदा जो आपल्याला मताचा अधिकार दिला आहे तो योग्य प्रकारे वापरता आला नाही. आपण नव्या युगातील लोकशाही प्रणाली स्वीकारली. ही प्रणाली आपले ध्येय आहे. निवडणुका हे आमचे साधन आहे. लोकशाही प्रक्रिया शुद्ध असावी ही आजच्या युगातील गरज आहे. लोकशाहीचे चारित्र्य सांभाळण्यासाठी लोकप्रतिनिधीही चारित्र्यसंपन्न असावेत. तसेच ते सज्जनही असावेत. निवडणुकीमध्ये आपण चारित्र्यसंपन्न आहोत असा दाखला द्यावा लागतो.

संपत्ती बाबत सर्व माहिती शपथेवर प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते. तसेच उमेदवाराच्या सर्व नातेवाईकांची संपत्तीची प्रतिज्ञापत्रे द्यावी लागतात. उमेदवार फौजदारी खटल्यात अडकला आहे का याचाही दाखला द्यावा लागतो. इतके पुरावे देऊनही काही लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन व गुंडगिरीला खतपाणी घालणारे निवडून जातात. खोटी प्रतिज्ञापत्र सादर करून निवडून येणारे अनेक जण आहेत. अशा लोकांनीच लोकशाही विद्रूप केलेली दिसते. सध्याच्या आमदार, खासदारा मध्ये अनेक जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. शासन त्यांच्यावर काही करू शकत नाही.

उलट अशा लोकांचा दबाव शासनावर असतो. आता मतदारांची भूमिका तपासावी लागेल. मतदार जर सुज्ञ, चिकित्सक व राष्ट्रप्रेमी असतील तर कोणत्याही प्रकारचे आमिष न स्वीकारता निर्भयपणे मतदान करतील. मत सुद्धा पवित्रा असावे. मत म्हणजे दक्षिणा नव्हे, जोगवा नव्हे. ते मेहरबानी म्हणून दान करता येणार नाही. ते विकणे अगर दान करणे किंवा जात, धर्म, पंथ या नावावर दान करणे महापाप आहे आणि बेकायदेशीर आहे. म्हणून मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत आपले मत कोणाला देतो असे आश्वासन देऊ नये. मत लिलाव करून लोकशाहीला काळीमा लावण्याचे काम कोणी करू नये. द्रव्याच्या लोभाने, दांडक्याच्या धाकाने किंवा सत्तेच्या दडपणाने आपले मत कोणी देऊ नये.

दुराचारी, व्यसनी किंवा सत्तेतून नागरिकांच्या हक्काची पायमल्ली करणाऱ्या उमेदवारांना मतदान करू नये. देव देवतांच्या नावावर सहली आयोजित करून काही उमेदवार भावनिक मत मागण्याचा प्रयत्न करतात. असे मत मागणे चुकीचे आहे. उमेदवार निष्कलंक, चारित्र्यसंपन्न व लोकांची सेवा करणारा असावा. सार्वजनिक कामांमध्ये पैसे खाणारा नसावा. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करावा. जाहीरनाम्याप्रमाणे त्यांनी पाच वर्षे काम केले पाहिजे. जाहीरनाम्यातील दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करावीत. अपक्षाला मत देऊ नये.

सध्या चाललेला गोंधळ पाहिल्यास मतदारांच्यावर मोठी जबाबदारी आहे. लोकशाहीची बुज राखण्यासाठी आपला प्रतिनिधी चांगला पाठवण्याची जबाबदारी प्रत्येक मतदाराचे आहे. येत्या 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदार निश्चितच किमया करून दाखवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *