बातमी

अध्यात्म ज्ञान घेण्यासाठी विनम्र भावनादींची योग्यता हवी – परमपूज्य परमात्मराज महाराज

आडी (राजकुमार पाटील) : आधुनिक शिक्षण घेण्यासाठी जशी पूर्व योग्यता हवी असते, त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञान घेण्यासाठी विनम्र भावनादींची योग्यता हवी असते. मनाला शांती व समाधान देणारी अध्यात्मविद्या ही सर्वोच्च आहे. असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने श्रावण पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी सकाळी श्रीदत्त मंदिरामध्ये श्री दत्तगुरूंच्या चरणांवरती अभिषेक अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, लहानपणी अर्भ शिक्षण दिले जाते. शाळा, कॉलेजमध्ये रूढशिक्षण दिले जाते. रूढशिक्षणाचा उपयोग उदरभरण आणि काही व्यावहारिक बाबींसाठी होतो. त्याशिवाय सांस्कृतिक शिक्षण सण, उत्सवाच्या माध्यमातून दिले जाते त्यातून विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होते.

नारळी पौर्णिमेचा सण समुद्राबद्दल आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीने नारळ अर्पण करण्याचा सण आहे. याप्रमाणेच अनेक सण मनुष्याला बोध देत असतात. जे शिक्षण अत्यंत इष्ट आहे ते म्हणजे अध्यात्म ज्ञानाचे शिक्षण होय. उद्धाराचा विषय मनाशी संबंधित आहे. मन कसे वागते यावर उद्धार अवलंबून आहे. फाटके शर्ट व धोतर घातलेली व्यक्ती देवळात जाऊन देवाचे धन्यवाद व्यक्त करीत असते हे पाहून एका धनवान व्यक्तीने विचारले की तुझ्या अंगावरती फाटके वस्त्र असून तू देवाचे आभार कसले मानतोस? त्यावर त्या व्यक्तीने सांगितले की जन्माला येताक्षणी नग्न होतो आता लाज राखण्याजोगी वस्त्रे दिली आहेत त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करीत आहे. हे अध्यात्म मार्गाने चालण्यासाठी, अध्यात्म मार्गात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेले सुप्रेष्ट शिक्षण आहे.

आपोआप कोणालाही सुखदुःख मिळत नाही ते त्याच्या पूर्वकर्मांद्वारे मिळत असते. व्यावहारिक शिक्षण चांगले आहे, त्याची गरज आहे पण आध्यात्मिक शिक्षण अनंत काळाच्या हितासाठी महत्त्वाचे आहे. अध्यात्मज्ञानाव्दारे सम्यक् त्वाने विचार करता येतो. अष्टावक्र महर्षी शरीराच्या दृष्टीने विचार करता आठ ठिकाणी वाकडे होते. परंतु ते महाज्ञानी होते. जनक राजाला त्यांनी आत्मज्ञान दिले. जीवनामध्ये जे मिळाले आहे त्याचा वापर करून घेण्याला महत्त्व आहे.

शास्त्रज्ञ थॉमस एडिसन हा एक बहिरा माणूस परंतु 1089 संशोधनाचे पेटंट त्यांनी मिळविले. जीवनामध्ये शारीरिक अथवा सांपत्तीक काहीतरी कमी असते किंवा वैगुण्य असू शकते. परंतु जे मिळाले आहे त्याचा सदुपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे. जीवनामध्ये अध्यात्म मार्गा साठी पोषक विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. अलेक्झांडरला जग जिंकल्याचा अहंकार झाला होता. सगळे त्याची वाहवा करीत होते. एक साधू तसाच पडून होता. त्याला अहंकाराने अलेक्झांडरने लाथ मारली.

सगळे माझी वाहवा करीत आहेत. तू का करीत नाहीस म्हणून विचारले. तेव्हा जग जिंकणे राजाचे काम आहे ते चांगलं केलंस. मात्र लाथ मारणे हे गाढवाचे काम आहे. असे साधूने हिंमतीने सांगितले. जग जिंकलेल्या अहंकारी राजाला गाढव म्हणण्याची हिंमत अध्यात्मात आहे. या जन्मातील राजा पुढील जन्मात भिकारीही होऊ शकतो. जगात कर्माचा सिद्धांत आहे. येथे कोणालाही माफ नाही. अध्यात्म मार्ग सर्वोच्च आहे. तो अनंत काळासाठी आहे या मार्गाने आचरण करायला पाहिजे. रेल्वेमध्ये भजन गाऊन पोटासाठी पैसे मागणारी एक व्यक्ती भरपूर पैशाचे प्रलोभन दिले तरीही चित्रपटातील अथवा अन्य अश्लील गाणी म्हणण्यास नाकारते. हे त्याचे नैतिक बळ आहे. ते अध्यात्म ज्ञानानेच मिळते. असे सांगितले.

यावेळी सुरज शंकरराव पाटील हुपरी यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृत्युंजय स्वामी सिद्धारूढ मठ शेंद्रीभैरी, सिटी हॉस्पिटल कोल्हापूरच्या डॉ. अर्चना पवार, वालावलकर हॉस्पिटल चे डॉ वीरेंद्र वनकुंद्रे, दै. सकाळ व दै. पुढारीचे माजी संपादक दिलीप लोंढे, सागर सिरॅमिक कोल्हापूरचे प्रवीण क्षीरसागर, अरुण शिंदे सांगली, प्रदीप जाधव कोल्हापूर, ॲड. अशोक देसाई गव्हाण सांगली, शरद रणदिवे, कुलदीप घाटगे वंदूर यांचा तसेच एम.डी. शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल डॉ. पूजा मगदूम, बारा लाख ‘जय परेश सर्वायण’ मंत्राचा जप लिहून पूर्ण केल्याबद्दल आप्पासो नरसगोंडा पाटील हंचिनाळ यांचा तसेच देणगीदार भाविकांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देविदास महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आडी, बेनाडी, निपाणी, कागल, कोल्हापूर, बेळगांव, चंदगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई इ. भागातून आलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यांतील हजारो भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *